Farmer Success Story : विदर्भातील शेतकरी बांधव नवनवीन प्रयोगासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. विदर्भ हे भाताचे आगार, कापसाप्रमाणेच इथे भाताची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. चंद्रपूर जिल्हा धान उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या मौजे तळोधी येथील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने भाताचे दोन नवीन वाण विकसित करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या या महिला शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. आसावरी पोशट्टीवार असे या प्रयोगशील महिला शेतकऱ्याचे नाव आहे.
या महिला शेतकऱ्याने आजवर अनेक संशोधन करत धनाचे वाण विकसित केले आहेत, या वाणाला संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठी मागणी असून परराज्यात देखील मागणी वधारू लागली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की चंद्रपूर जिल्ह्यात या आधी देखील भाताचे नवीन वाण विकसित झाले आहेत.
यामध्ये एचएमटी व जय श्रीराम या जाती प्रमुख आहेत. आता या महिला शेतकऱ्याने देखील भाताचे नवीन वाण विकसित करून चंद्रपूर जिल्ह्याचा संपूर्ण राज्यात नावलौकिक वाढवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील महिला शेतकरी आसावरी पोशट्टीवार यांचे सासरे देखील एक प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ख्यातीनाम आहेत. शेतकरी अण्णासाहेब पोशट्टीवार असं त्यांचं नाव असून ते धान उत्पादनासाठी संपूर्ण पंचक्रोशीत ओळखले जातात.
दरम्यान आता महिला शेतकरी आसावरी यांनी आपल्या सासरेबुवाच्या आशीर्वादाने शेती व्यवसायात एक नवीन क्रांती घडवण्यासाठी आगे कूच केली आहे. त्यांनी धानाचे नवीन वाण विकसित करून इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी प्रेरित करण्याचे काम केले आहे. शिवाय महिलांना देखील आता शेती व्यवसायात पहिल्या पंक्तीत येऊन काम करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
आसावरीताई यांनी आपल्या सहा एकर शेतीजमिनीत भातासाठी प्रयोगशाळा विकसित केली आहे. सद्य:स्थितीत पूर्व विदर्भासाठी पूरक असलेल्या लाल तांदळाची निर्मिती त्यांनी केली आहे. तळोधी रेड -25 आणि लाल गुलाब 2-12, 12 -9 या धानाच्या दोन वाणांची निर्मिती त्यांनी केली आहे. निश्चितच महिला शेतकऱ्याने शेतीमध्ये केलेली ही क्रांती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून यामुळे इतर शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सद्य:स्थितीत शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नाने तळोधी रेड -25 निशिगंध, तळोधी हिरा -125, साईभोग,गणेश,चाफा, गुलाब, चिंन्नोर -27,पार्वती चींन्नोर, तळोधी हिरा-135,पार्वती सुत- 27, बसमती 33- 2, निलम इत्यादी भाताच्या नवीन वाणांची निर्मिती करण्यात आली आहे. या वाणांतून निर्माण झालेला तांदूळ कर्नाटक,आंध्रप्रदेश, मराठवाडा, तेलंगणा राज्यात नागरिकांच्या पसंतीस खरा उतरला आहे. निश्चितच यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.