कृषी

Farmer Success Story: 18 गुंठ्यात 57 टन घेतले उसाचे उत्पादन! कसं शक्य केलं या शेतकऱ्याने? वाचा माहिती

Farmer Success Story:- शेती तंत्रज्ञान आणि विविध पिक पद्धतींचा अवलंब यामुळे आता शेतकरी विपरीत बदलत्या हवामान परिस्थितीच्या अनुषंगाने देखील खूप मोठ्या प्रमाणावर भरघोस असे उत्पादन मिळवताना आपल्याला दिसून येतात. तंत्रज्ञानाच्या वापराने  तुम्ही किती क्षेत्रामध्ये पिकाची लागवड केली आहे.

त्यापेक्षा आहे त्या क्षेत्रामध्ये लागवड केली आहे परंतु त्याचे व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा वापर कसा केला आहे? या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण शेतकरी आता अगदी काही गुंठ्यामध्ये देखील दोन एकर क्षेत्रात उत्पादन निघेल इतके उत्पादन मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.

यामागे व्यवस्थापनाच्या शास्त्रशुद्ध पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या वाघवे या गावच्या उदय पाटील या तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने 18 गुंठा क्षेत्रामध्ये तब्बल 57 टन उत्पादन घेतलं.

म्हणजेच एका गुंठ्याला तब्बल तीन टन उसाचे उत्पादन मिळवून एक उच्चांक स्थापित केला आहे. नेमके उदय पाटील यांनी हे कसं शक्य करून दाखवले? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 18 गुंठ्यात 57 टन उसाचे उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे या गावचे उदय पाटील या तरुण शेतकऱ्याने 18 गुंठा क्षेत्रात 57 टन उसाचे उत्पादन घेण्याची किमया साध्य करून दाखवली आहे.

तसेच यामध्ये भुईमूग, मिरची व मेथी सारखे अंतर पिकातून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. म्हणजेच उदय पाटील यांनी 50 हजार रुपये खर्च करून  निव्वळ अडीच लाख रुपयाचा नफा या 18 गुंठ्यात मिळवण्यात यश मिळवले आहे.

 उदय पाटील यांनी कसं केलं शक्य?

पाटील हे खाजगी नोकरी करतात व शेतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. या प्रयोगातूनच त्यांनी एका गुंठ्याला तीन टनापेक्षा अधिक विक्रमी उसाचे उत्पादन घेतले आहे.

याकरिता त्यांनी 18 गुंठ्यात दहा ट्रॉली शेणखत घालून उभी आडवी नांगरणी केली व दक्षिण उत्तर अशी चार फुटांची सरी सोडली व 30 ऑगस्ट 2022 रोजी 86032 या उसाच्या जातीची दीड फुटावरती एक डोळा पद्धतीने लागवड केली. या ऊस लागवडीतून त्यांना 18 गुंठ्यामध्ये 57 टन उसाचे उत्पादन मिळाले.

या 18 गुंठ्यावरील उसाची तोड काही दिवसांपूर्वीच करण्यात आली व त्यातून त्यांना हे उत्पादन मिळाले. यामध्ये त्यांना आंतर पिकापासून सव्वा लाख आणि ऊसापासून अडीच लाख असे 18 गुंठात तीन लाखांचे उत्पादन मिळाले. यासाठी 50 हजार रुपये खर्च वजा जाता त्यांना अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा या माध्यमातून मिळाला.

 भुईमूग आणि मिरचीच्या आंतरपीकाने केला आर्थिक फायदा

आंतरपीक म्हणून उदय पाटील यांनी भुईमूग आणि मिरची पिकाची लागवड केली व ठिबक सिंचनाने पाण्याचे व्यवस्थापन करत उसाच्या भरणीपर्यंत नॅनोटेक हायटेक आणि बायोझॅम यांच्या दोन महिने आळवण्या केल्या.

त्यानंतर बाळ भरणी करून मेथीचे पीक देखील घेतले. सगळ्या पिकांचे नियोजन करताना वेगवेगळे खत व औषधांचा वापर करून पावर टिलरने उसाची अंतिम भरणी केली.

या उसाची उंची सहा फुटापेक्षा जास्त होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोन-तीन टॉनिकच्या फवारण्या केल्या व पंधरा महिन्यात ऊस शेतामध्ये तणनाशकाचा वापर न करता  पावर टिलर ने नांगरणी करून आंतरमशागत केली. या सगळ्या अनोख्या व्यवस्थापनामुळे उसाची वाढ चांगली होऊन 18 गुंठ्यात त्यांना हे भरघोस उत्पादन मिळाले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts