Farmer Success Story:- शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब केला तर शेतीही आता व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरत आहे. उपलब्ध पाण्यातून आणि बाजारपेठेचा अभ्यास करून नियोजन करत केलेली शेती नक्की शेतकऱ्यांना फायद्याची ठरते. यामध्ये बरेच तरुण शेतकरी आता फळबाग शेतीकडे वळले असून विविध प्रकारच्या फळबागांची लागवड यशस्वीरित्या केली जात आहे.
फळबाग शेतीतून शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाल्यामुळे बरेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होताना आपल्याला दिसून येते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बुलढाणा जिल्ह्यातील बोरी या गावचे धोंडू कुंडलिक चनखोरे यांच्या शेती बद्दल विचार केला तर त्यांच्याकडे 45 एकर वडिलोपार्जित शेती आहे. परंतु पारंपारिक पिकांना जोड म्हणून कमीत कमी खर्चात शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा याकरिता त्यांनी चिकू पिकाची निवड केली व ती त्यांच्यासाठी खूप मोठी फायद्याचे ठरलेली आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
चिकू बागेने आणला गोडवा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरी जिल्हा बुलढाणा येथील धोंडू कुंडलिक चनखोरे हे शाश्वत अशा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून वेगवेगळ्या पिकांचा पर्याय शोधत असताना त्यांनी सन 2000 मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाला भेट दिली व चिकू पिकाविषयी त्या ठिकाणी माहिती घेतली व काही शेतकऱ्यांच्या अनुभव देखील जाणून घेतला.
त्यानंतर त्यांनी चिकू लागवड करण्याचे निश्चित केले व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून त्यांनी चिकूची कलमे आणली व 33 बाय ३३ फूट अंतरावर लागवड केली. चिकूची लागवड करण्यासाठी त्यांनी कालीपत्ती या चिकूच्या वाणाची निवड केली व आज सहा एकर मध्ये त्यांची बाग दिमाखात उभी आहे.
धोंडू चनखोरे यांचे कैलास, गजानन आणि प्रवीण या तीनही मुलांनी चिकू बागेची खूप उत्तम पद्धतीने जोपासना केली असून लागवडीनंतर त्यांनी दहा वर्षाचे झाड होईपर्यंत त्यामध्ये आंतरपीक देखील घेतले. परंतु आज झाडे उत्पन्न देऊ लागले असून संपूर्ण झाडांची वाढ देखील एकसारख्या व समान पद्धतीने झालेली आहे.
या बागेसाठी खत व्यवस्थापन करताना त्यांनी शेणखत व गांडूळ खतांसारख्या सेंद्रिय खतांचा वापर जास्त केला. तसेच किडनियंत्रणामध्ये फुल पोखरणारी अळीची समस्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर असते व बागेवर जेव्हा फुलोरा अवस्था असते तेव्हा ही अळी खूप नुकसान करते. याकरिता ते धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर करून फुल पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करतात. पाण्याचे व्यवस्थापन करताना ते हिवाळ्यापासून ते मे महिन्यापर्यंत पाट पाणी देण्याचा प्रयत्न करतात.
आज मिळायला लागले इतके उत्पन्न
लागवड केल्यापासून सुरुवातीची सहा ते सात वर्षांपर्यंत झाडांवर कुठल्याही प्रकारचे फळ धरले नाही. त्यानंतर मात्र फळ धरण्यास सुरुवात केली व आज सुरुवातीला प्रत्येक झाडापासून 50 किलो पर्यंत फळ मिळायचे. आता एका झाडापासून तीनशे ते चारशे किलो पर्यंत फळ मिळत असून अंदाजे 15 किलो प्रति झाड याप्रमाणे दरवर्षी त्यामध्ये भर पडत आहे.
चिकू बागेचे बहार नियोजन करताना ते वर्षातून फक्त एक वेळेसच करतात. साधारणपणे फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या कालावधीत फळ काढणीस येते. फळ काढताना संपूर्ण फळांची काढणी मजुरांच्या साह्याने केली जाते व तोडलेली फळे एक दिवस जमिनीवर पडू दिले जातात.
कारण चिकू तोडल्यानंतर त्याच्या मागच्या देठाजवळून जो काही चिकट द्रव्य बाहेर येतो व हा चिकटद्रव्य सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळे गोळा केली जातात व त्यांची प्रतवारी केली जाते. नंतर क्रेट भरून गाड्यांच्या माध्यमातून माल विक्रीसाठी पाठवला जातो. चिकू बागेचा तोडणीचा हंगाम तीन महिन्यांपर्यंत चालतो.
असे केले विक्रीचे नियोजन
काही टन माल निघत असल्यामुळे बुलढाणा व परिसराशिवाय ते मध्य प्रदेशातील रायपूर, जबलपूर आणि बिलासपुर या ठिकाणी चिकू विक्रीसाठी पाठवतात. कारण त्या ठिकाणी चिकूला चांगली मागणी असते व अनेक वर्षांपासून त्यांचे व्यापाऱ्यांसोबत संबंध चांगले असल्यामुळे त्या ठिकाणी दर देखील चांगला मिळतो.
त्या ठिकाणी साधारणपणे प्रति किलो 30 ते 40 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो. फड तोडण्यापासून ते वाहतूक खर्च प्रति फळ दहा रुपयांचा खर्च येतो असे ते सांगतात. याबाबतीत गजानन सांगतात की मध्यप्रदेशचे बाजारपेठ दूर आहे. परंतु त्या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये प्रति किलोचा दर मिळाला तर प्रत्येक किलो दहा रुपये पाठवण्याचा खर्च जरी वजा केला तरी वीस रुपये दराने चिकू विक्री त्या ठिकाणी परवडते. त्यांनी या चिकू बागेच्या जोरावर दहा एकर जागा देखील घेतली व गावांमध्ये दोन घरे देखील घेतलेले आहेत.
अशा पद्धतीने गजानन चनखोरे व त्यांच्या बंधूंनी चिकू बागेच्या माध्यमातून व्यवस्थित नियोजनाने उत्तम अशी आर्थिक समृद्धी मिळवली आहे.