Agriculture News : सध्या थंडी चांगलीच जाणवू लागल्याने खरीप हंगामात पेरलेल्या तुरीच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले असून, रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभऱ्यासह कांदा पिकालाही ही वाढती थंडी पोषक ठरत आहे.
गेल्या आठवड्यातील बदललेल्या वातावरणामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा पिकाला बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फवारणी करावी लागली होती; परंतु थंडीचा जोर वाढला असल्याने आता पिके जोमदार दिसत आहेत.
कोरडवाह भागातील हरभरा, ज्वारी ही पिके वाढत्या थंडीमुळे चांगली आहेत. रात्री व पहाटे प्रचंड प्रमाणात गारवा जाणवत आहे, गेल्या काही दिवसांमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे सायंकाळी सहा वाजल्यानंतर थंडीचे प्रमाण चांगले जाणवत आहे.
सुपा परिसरात सध्या तापमानाचा पारा खाली आला आहे. किमान व कमाल तापमानात घसरण झाली असल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन थंडी चांगलीच झोंबू लागली आहे, थंडीमुळे रब्बी हंगामातील उत्पादनात वाढ होईल, या आशेमुळे शेतकरी सुखावले असल्याचे चित्र दिसत आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी वाढणारी थंडी अत्यंत लाभदायक आहे. सध्या अनेकांना ही थंडी त्रासदायक वाटत असली तरी रब्बी पिकांसाठी पोषक ठरत आहे. प्रारंभी पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्याने गव्हाचे पिक चांगलेच बहरले आहे.
गेल्या महिन्यातील ढगाळ वातावरण व धुके, यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मावा, बुरशी रोगाचे अतिक्रमण झाले. यात मोठ्या प्रमाणावर किटकनाशकाची फवारणी केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता, मात्र आता पडलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामात येणारी पिके लाभदायक होतील, अशी अपेक्षा शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.