Agriculture News : निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे रब्बी खरीप दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी पायपीट केली मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दुसरीकडे मात्र कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी सन २०२३ मध्ये सात एकर गव्हाचे पीक रब्बी हंगामात घेतले होते परंतु निसर्गाच्या अवकृपेने वादळी पाऊस व गारपीट यामुळे सात एकर गव्हाचे पीक भुईसपाट झाले होते. त्यानंतर त्यांनी रीतसर लेखी निवेदन शेवगावचे तहसीलदार छगन वाघ यांना दिले होते.
तहसीलदार साहेबांचे आदेशानुसार महसूलचे कर्मचारी सोनाली दहिफळे व कृषी खात्याचे कर्मचारी अनंत रणमले यांनी तातडीने शेतात येऊन गहू पिकाचा तात्काळ पंचनामा केला. व त्याचा अहवाल शासनास सादर केला.
नुकसानग्रस्त शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी जिल्हा अधिकारी ते मंत्रालय यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी पायपीट केली. परंतु आज तागायत त्यांना शासनाकडून एक रुपयाची ही देखील मदत मिळाली नाही ही मदत आलेली नसतानाच
पुन्हा एकदा नोव्हेंबर २०२३ रोजी नैसर्गिक आपत्तीने शिंदे बाळासाहेब या शेतकऱ्याचे तीन एकर कांदा पिकाचे नुकसान झाले.
या पिकाच्या उत्पन्नासाठी शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. अशाच परिस्थितीत सरकारने कांदा निर्यातीची बंदी घालून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे शेती व्यवसायावर कसे जीवन जगावे हा मोठा प्रश्न शेतकरी शिंदे बाळासाहेब यांच्यासमोर उभा राहिलेला आहे.