रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी संकटात ; नवीन वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक झळ

Mahesh Waghmare
Published:

६ जानेवारी २०२५ देगाव : रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कधी अस्मानी, कधी सुलतानी, कधी अवकाळी संकटाने शेतकरी व्यापला आहे.

शेतमालाला दर नसल्याने आर्थिक संकटात असणारा शेतकरी अद्याप सावरलेला नसताना नवीन वर्षात शेतकऱ्यांसमोर खत दरवाढीचे संकट उभे राहिले आहे. युरियाचे भाव वाढले नसले तरी इतर खतांच्या किमतीत २०० ते ३०० रुपयांनी मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नवीन वर्षातच १ जानेवारी पासून खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीत दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.अगोदरच शेतमालाला बाजारभाव नाही.त्यात आता खतांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतातील पिकांना खते वापरावी का न वापरावी, या संभ्रमात शेतकरी आहेत.वर्षभर शेतात ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता रात्र दिवस कष्ट करून निसर्गाच्या अस्मानी, सुलतानी संकटे, त्यात निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पन्न पदरी पडते.

मात्र, निसर्गाची अवकृपा झाली तर आर्थिक भुर्दंडसुद्धा सोसायचा. त्यानंतर शासनाकडे मदतीसाठी हात पसरायचा, मग शेतकऱ्यांना शासनही उभे करत नाही. अशावेळी शेतकरी वर्गाने दाद कोणाकडे मागायची ? शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार असल्याचे शासन वारंवार सांगते. मात्र, आजतागायत शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे.

खरीप हंगामात अति पाऊस व अवकाळी ने झालेले नुकसान कसे भरून काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच नवीन वर्षात रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान खत उत्पादक कंपनीने रासायनिक खतांच्या किमती वाढवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नवीन वर्षात रासायनिक खतांच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे.

अगोदरच रासायनिक खतांचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी पाच-सहा पोत्यांऐवजी ऐवजी दोनच पोती वापरत आहेत. शेतामध्ये कोणतेही पीक घ्यायचे म्हटले तर शेतकऱ्यांना रासायनिक खताशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. उधार, उसनवारी, सावकारांकडून पैसे उचलून शेतकऱ्यांना खते खरेदी करावीच लागतात.

मागील दहा वर्षाच्या काळात खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मात्र, त्या तुलनेत शेतीमालाला भाव मिळत नसल्याने या पुढील काळात शेती करायची का नाही ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे आहे.त्यामुळे शासनाने खतांच्या किमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खतांच्या किमतीचा तपशील

डीएपी १३५० – १५९०
टीएसपी ४६ टक्के – १३००-१३५०
१०.२६.२६-१४७० – १७२५
१२.३२.१६-१४७० – १७२५

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe