Shetkari Yojana:- राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना या राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमधील महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे.
राज्य तसेच केंद्र सरकारकडून अनेक योजना या शेती क्षेत्रासाठी राबविण्यात येतात. जर आपण महाराष्ट्र शासनाची एक योजना पाहिली तर ती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असून या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन विहीर बांधकामापासून तर जुन्या विहिरीची दुरुस्ती व इतर अनेक घटकांकरिता लाखो रुपयांचे अनुदान मिळते.
या प्रकारचे अनुदान कृषी विभागामार्फत अनुसूचित जमाती करिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व अनुसूचित जातीकरिता बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यांच्या माध्यमातून राबवण्यात येते.
या दृष्टिकोनातून सध्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत असून याकरिता शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.
कोणत्या घटकाकरता मिळते किती अनुदान?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिरी करिता चार लाख, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख, इनवेल बोरिंग करिता 40000, विज जोडणी आकार याकरिता वीस हजार,
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करायचे असेल तर दोन लाख किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90%, सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक सिंचनाकरिता दहा किंवा पंधरा टक्के म्हणजे 97 हजार पर्यंत अनुदान या माध्यमातून देण्यात येते अशी माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमाती करिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना( क्षेत्रांतर्गत व क्षेत्र बाहेरील) व अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत.
सन 2024-25 करिता या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील अशा शेतकऱ्यांनी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर फार्मर लॉगिन वर जाऊन अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
किती आहे उच्चतम अनुदानाची मर्यादा?
एचडीपीई पाईपकरिता 5 हजार( राष्ट्रीय सुरक्षा अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार किमतीच्या शंभर टक्के किंवा उच्चत्तम मर्यादा पाच हजार रुपये), यंत्रसामग्री( ट्रॅक्टर चलीत, बैलचलित अवजारे) 50000, विंधन विहीर( नवीन बाब) पन्नास हजार रुपये अशी आता बाबनीहाय उच्चतम अनुदानाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
काय आहेत या योजनेच्या अटी व शर्ती?
1- यामध्ये शेतकरी हे अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील असावेत व शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2- तसेच नवीन विहीर घटकांतर्गत लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
3- नवीन विहीर या घटकाऐवजी या योजनेतील अन्य बाबीं करिता किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. याकरिता कमाल क्षेत्र मर्यादा सहा हेक्टर इतकी आहे.
4- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल सहा हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू आहे.
5- तसेच शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा सातबारा आणि आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
6- लाभार्थीकडे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे.