कृषी

Goat Rearing : पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या शेळ्यांची काळजी आणि टाळा नुकसान, वाचा ए टू झेड माहिती

Goat Rearing :- शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चात, कमीत कमी जागेत सर्वात जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. या व्यवसायामध्ये आता अनेक  सुशिक्षित तरुण देखील येत असून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून हा व्यवसाय आता केला जात आहे. शेळीपालन व्यवसाय फायद्याचा व्हावा याकरिता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून देखील बऱ्याच बाबींवर लक्ष केंद्र करणे गरजेचे असते.

यामध्ये शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते व त्यातल्या त्यात ऋतुमानानुसार व्यवस्थापनात देखील बदल करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण या लेखात पावसाळ्यामध्ये शेळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दलची माहिती घेणार आहोत.

 पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या शेळ्यांची काळजी

यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शेळ्या आद्रता सहन करत नाहीत व या दिवसांमध्ये आद्रतेचे प्रमाण कमी जास्त होत असते. त्यामुळे शेळ्यांना श्वसन संस्थेचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेळ्यांचे व्यवस्थापन करताना त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन ते करावे….

1- जेवढ्या शेळ्या असतील तेवढ्या शेळ्यांना  जंतुनाशक औषध देणे गरजेचे असून त्यामुळे शेळ्या जंतमुक्त राहण्यास मदत होते. जेव्हा पाऊस पडून जातो तेव्हा हवेमध्ये आद्रता आणि उष्णता निर्माण होते. ही उष्णता जंतांची अंडी व गोचीड वाढण्यासाठी अनुकूल असते  व त्यामुळे शेळ्यांच्या अंगावर गोचीडचा प्रादुर्भाव होतो. यामुळे शेळ्यांना विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. गोचीडचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अंगावर खाज सुटणे तसेच शेळ्यांमध्ये बैचनी दिसून येते व त्या खाणे बंद करतात. या सगळ्या त्रासापासून वाचण्याकरिता शेळ्यांच्या अंगावर गोचीड प्रतिबंधक औषध लावावे.

2- शेळ्यांना उष्णता सहन होते परंतु आद्रता अजिबात सहन होत नाही. गोठ्यामध्ये आद्रता कमी राहावी याकरिता रात्री शेळ्यांच्या गोठ्यामध्ये शेगडी लावावी अथवा साठ होल्टचा विजेचा बल्ब रात्रभर लावणे महत्त्वाचे ठरते.

3- गोठ्यातील स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाचे आहे. शेळ्यांचे मलमूत्र दररोज स्वच्छ करणे गरजेचे असून असं केले नाही तर गोठ्यातील जमीन ओली राहते व त्यामुळे पायाच्या खुरांमध्ये ओलसरपणा राहतो व पायाला फोड येण्याची शक्यता असते व शेळ्या लंगडतात. तसेच त्यांना ताप येतो व चारा कमी खायला लागतात.

3- तसेच पावसाळ्यामध्ये शेळ्यांना चरण्याकरिता बाहेर सोडू नये. कारण जर पावसामध्ये जास्त कालावधी करिता शेळी भिजली तर तिला न्यूमोनियासारखा आजार होण्याची दाट शक्यता असते.

4- पावसाळ्यामध्ये सगळीकडे गवत उगवते व ते कोवळे असते. असे गवत जर शेळ्यानी खाल्ले तर यामुळे शेळ्यांना अपचन होते व पोटफुगी तसेच हगवणी सारखे आजार होतात. शेळ्यांना पोटफुगी होऊ नये याकरता गोडतेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते.

5- तसेच शेळ्यांना आंत्रविषार हा आजार होऊ नये म्हणून लसीकरण करून घ्यावे.

6- गोठ्यातील अस्वच्छतेमुळे किंवा चुकीच्या व्यवस्थापनामुळे शेळ्यांना फुफूसदाह हा आजार होण्याची शक्यता असते व या आजाराच्या नियंत्रणाकरिता लसीकरण करणे गरजेचे आहे. तसेच लाळ्या खुरकूत करिता देखील लसीकरण करून घ्यावे.

7- या आजारांसोबतच घटसर्प आणि फऱ्या नावाचा आजार देखील होण्याची शक्यता असते. म्हणून याकरिता देखील खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण हाच एक पर्याय आहे.

 गाभण शेळ्यांची अशा पद्धतीने घ्यावी काळजी

1- पावसाळ्यामध्ये जर शेळी गाभण असेल तर तिची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यात महत्त्वाचे म्हणजे गोठा कोरडा ठेवणे गरजेचे आहे. जर गोठा ओला असेल व चालताना शेळी घसरून पडू शकते व त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.

2- पावसाळ्यामध्ये शेळ्या जास्त प्रमाणात वितात. यामुळे गर्भाशयाचे तोंड या कालावधीत उघडे असते. जर या परिस्थितीत आजूबाजूचा भाग किंवा योनीचा भाग स्वच्छ नसेल तर गर्भाशयात जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. हे टाळण्याकरिता शेळी विल्यानंतर तिचा पाठीमागचा भाग गरम पाणी आणि सौम्य जंतूनाशकाचा वापर करून स्वच्छ करावा.

3- पावसाळ्यात शेळ्यांना धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते व त्यामुळे धनुर्वाताचे इंजेक्शन द्यावे.

या पद्धतीने जर पावसाळ्यामध्ये शेळ्यांची काळजी घेतली तर नक्कीच नुकसान टाळता येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts