Goat Species:- शेतीला जोडधंदा म्हणून कमीत कमी खर्चात, कमीत कमी जागेत मोठा नफा मिळवायचा असेल तर पशुपालनाला एक उत्तम पर्याय म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय करत असून त्यामध्ये यशस्वी देखील होत आहेत.
शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन जितके गरजेचे आहे तितकेच तुम्ही शेळीपालनासाठी कोणत्या जातींच्या शेळ्यांची निवड करत आहात? त्यावर सर्वात जास्त शेळी पालन व्यवसायाचे यश अवलंबून आहे. तसे पाहायला गेले तर भारतात व महाराष्ट्रात अनेक जातींच्या शेळ्यांचे पालन केले जाते.
परंतु त्यामध्ये काही जातींच्या शेळ्या या शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून अतिशय फायद्याच्या ठरतात. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये शेळीपालनासाठी फायदेशीर व शेळीची जातिवंत अशा एका जातीची माहिती घेणार आहोत.
बारबारी जातीची शेळी आहे शेळीपालनासाठी फायदेशीर
जर आपण प्राणी तज्ञांचा विचार केला तर त्यांच्या मते बऱ्याच जातींचे गाय किंवा म्हैस तसेच शेळ्यांचे नाव हे त्या ज्या परिसरामध्ये आढळून येतात त्या नावावरून ते ठेवले जाते. त्यामध्ये जर तुम्ही शेळ्यांचा विचार केला तर उत्तर प्रदेश या राज्याची एक खास ओळख असून बारबारी जातीची शेळी देखील उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
परंतु शेळीची ही जात मूळची उत्तर प्रदेश मधील नसून ती आफ्रिकी देशांमध्ये असलेल्या सोमालया येथील बेरिया परिसरामध्ये जास्त प्रमाणात आढळते व यावरून या जातीच्या शेळीचे नाव बारबारी अथवा बरबरी असे पडले आहे. या जातींच्या शेळ्यांना मुर्हा म्हैस असे देखील म्हटले जाते.
या जातींचे वैशिष्ट्य म्हणजे दूध देण्याचे क्षमता तसेच मांस उत्पादन क्षमता व एका वेळेस दोन पिल्लांना जन्म देण्याची क्षमता या गोष्टींमुळे हिचे पालन खूप महत्त्वाचे ठरते. बारबरी जातीच्या शेळ्यांची मागणी अरब देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जर या जातीच्या बोकडचे वजन पाहिले तर ते 25 ते 40 किलो पर्यंत असते.इतर देशांमध्ये बरबरी जातीच्या बोकडांना खूप मोठी मागणी आहे. या जातीच्या बोकडचे किंवा शेळ्यांचे मांस हे खूप चविष्ट असल्यामुळे याला मागणी जास्त असते.
या जातीच्या शेळीचे मांस हे टीनमध्ये पॅक करून कतार, सौदी अरब तसेच कुवेत, यूएई इत्यादी ठिकाणी सप्लाय केले जाते. तसेच कुर्बानीसाठी देखील या जातीच्या शेळ्यांना खूप मोठी मागणी असते. बारबारी शेळ्यांच्या जातींची शारीरिक रचना पाहिली तर या जातींची शेळ्या व बोकड यांचे कान वरच्या बाजूला असतात व ते छोटे आणि उभ्या स्थितीत असतात. प्रामुख्याने या जातीच्या शेळ्यांचा रंग हा सफेद असतो व त्यावर भुऱ्या रंगाचे ठिपके असतात. नाक चपटे असते व या जातीच्या शेळ्यांचा शरीराचा मागचा भाग हा वजनदार असतो.
बरबरी जातीच्या शेळ्यांचे वैशिष्ट्ये
1- 13 ते 14 महिन्याच्या वयामध्ये ते प्रजननासाठी सक्षम होतात.
2- पंधरा महिन्याच्या कालावधीत ते दोन वेळा पिल्लांना जन्म देतात.
3- प्रजननाच्या दुसऱ्या वेळेपासून ते 90% पर्यंत दोन ते तीन पिल्लांना जन्म देतात.
4- जर या जातीच्या शेळीची दूध देण्याची क्षमता पाहिली तर ती 175 ते 200 दिवसांपर्यंत दूध देऊ शकते व दररोज एक लिटर पर्यंत दूध देते.
देशामध्ये जर या जातीच्या शेळ्यांची संख्या पाहिली तर ती 20 लाख पेक्षा जास्त आहे. या जातींच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार ही संस्था सीआयआरजी मथुरा, फरह खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. या जातीच्या शेळीपालनासाठी अनेक प्रकारचे अभ्यासक्रम देखील तयार करण्यात आलेल्या असून या मध्ये तुम्हाला बरबरी जातीच्या शेळ्यांचे पिल्ले देखील मिळतात व यांचा उपयोग तुम्हाला ब्रीडींग सेंटर चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. या एकूण वीस लाख संख्येमध्ये 15 लाख शेळ्या दूध देणाऱ्या आहेत.
यावरून आपल्याला कळते की बारबरी जातीची शेळी शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचे आहे.