Onion Rate : गेल्या अनेक महिन्यांपासून दबावात असलेले कांदा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यापासून तेजीत आले होते. नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव उच्चांकि पातळीवर पोहोचलेत. त्यावेळी कांद्याला किरकोळ बाजारात तब्बल 70 ते 80 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळत होता.
काही शहरांमध्ये याहीपेक्षा अधिक दर नमूद करण्यात आला. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांमध्ये शासनाविरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात होते. यामुळे शासनाच्या माध्यमातून किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉक मधील कांदा पंचवीस रुपये प्रति किलो या दरात किरकोळ बाजारात विक्री करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय कांदा निर्यात शुल्क वाढवण्याचा मनमानी निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. याचा परिणाम म्हणून काही काळ किरकोळ बाजारातील किंमती कमी झाल्यात. पण या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या निर्णयामुळे कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात.
बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर 2 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आल्यात. आता मात्र पुन्हा एकदा कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होऊ लागली आहे. देशात निर्यात बंदी असतानाही बाजारभावात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे.
आज राज्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्यात बंदी लागू असतानाही कांदा बाजारभावाने 3000 रुपयांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.
बाजारभावात निर्यात बंदी लागू असतानाही सुधारणा झाली असल्याने आगामी काळात आणखी भाव वाढ होईल अशी भोळी भाबडी आशा देखील आता शेतकऱ्यांना लागली आहे. केंद्र शासनाने 7 डिसेंबरला निर्यात बंदी लागू करण्याचा मनमानी निर्णय घेतला.
या निर्णयापूर्वी कमाल चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल भाव मिळत होता. मात्र हा निर्णय घेतल्यानंतर कांद्याच्या किमती पंधराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आल्यात. यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही अशी परिस्थिती तयार झाली होती.
मात्र आता पुन्हा एकदा बाजारभावात सुधारणा झाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज म्हणजे 5 जानेवारी 2024 रोजी झालेल्या लिलावात कोल्हापूर एपीएमसी मध्ये कांद्याचा कमाल भाव 3100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला आहे.
एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, कामठी याव्यतिरिक्त विदर्भातील नागपूर आणि सातारा येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा कमाल भाव 3 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा झाला आहे. तसेच किमान भाव 500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत नमूद करण्यात आला आहे.
बाजारभावात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधान आहे. मात्र बाजारभावात आणखी वाढ झाली पाहिजे अशी आशा देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.