Good News To Farmers : महायुती सरकारने २०१७ साली जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेत ३० जून २०१६ रोजी दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सरकारने अचानक पोर्टल बंद केले होते.
शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका त्या विरोधात दाद मागितली होती. अखेर याप्रकरणी न्यायालयाने ही कर्जमाफी देण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटींची कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अॅड. अजित काळे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अॅड. काळे बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, रुपेंद्र काले, युवराज जगताप यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
अॅड. काळे म्हणाले, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटनांच्या शेतकरी संप आंदोलनामुळे २८ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमुक्तीची घोषणा केली होती;
मात्र अंमलबजावणी करताना सुमारे ५ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांप्रमाणे कर्जमुक्ती देण्याचा आदेश दिला.
तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही, म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली. न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाखाच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांना सुमारे सहा हजार कोटी रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले.