श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील शेतकरी बाळासाहेव वसंतराव वाणी (वय ३०) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून दिघी- खंडाळा रोडवर असलेल्या शेतातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बाळासाहेव वसंतराव वाणी हे दिघी येथील तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव मुरलीधर वाणी यांचे चिरंजीव होत. त्यांच्याकडे एका खासगी बँकेची पाच लाख रुपये थकबाकी होती. त्यांनी इतर नातेवाईकांकडून काही पैसे जमा करून बँकेची थकबाकी भरली होती.
तसेच खाजगी सावकाराकडून व्याजाने रक्कम घेतलेली होती. त्यातच मागील वर्षी अज्ञात व्यक्तीने त्यांचा दोन ते तीन एकर पिकवलेला हरभरा पेटवून दिला. तसेच सोयाबीन पीकही पावसाअभावी वाया गेले.
त्यांच्या वडिलांच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यात होणारा खर्च अधिक होता. हा सर्व खर्च आणि कर्ज हे उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने या सर्व प्रकारच्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब वाणी यांनी दिघी-खंडाळा रोडवर असलेली गावातीलच वाणी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.