कृषी

हरभऱ्याचे प्रचंड नुकसान करते घाटेअळी! करायचे नियंत्रण व पिकाचे संरक्षण तर कमी खर्चाचे करा ‘हे’ उपाय

रब्बी हंगामामधील जर आपण प्रमुख पाहिले तर ते प्रामुख्याने गहू आणि हरभरा असल्याचे आपल्याला दिसून येते. गव्हानंतर जर आपण हरभरा लागवडीचे जर महाराष्ट्राचे क्षेत्र बघितले तर ते मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हरभरा लागवड केली जाते.

तसे पाहायला गेले तर हरभरा पिकाला बाजारपेठेत वर्षभर मागणी चांगल्या पद्धतीने असल्याने बाजारभाव देखील चांगल्या पद्धतीने टिकून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवड ही फायद्याचे ठरते. परंतु हरभरा पिकाचे जर चांगले उत्पादन हवे असेल तर व्यवस्थापन देखील तितकेच उत्तम पद्धतीने करणे गरजेचे असते.

हरभरा पिकाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये कीड व रोग व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. हरभरा पिकाचे सर्वात जास्त नुकसान करणारी जर कोणती कीड असेल तर ती म्हणजे घाटे अळी होय. हरभरा पिकावर जर घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला तर उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता असते.

त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे. घाटे अळीचे जर आपण स्वरुप बघितले तर या किडीची मादी पतंग पानावर तसेच हरभऱ्याच्या कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते व ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसून येतात व त्यातून दोन ते तीन दिवसांमध्ये अळ्या बाहेर पडतात.

घाटे अळीचे जर नुकसानीची तीव्रता पाहिली तर ही पानांमधील जे काही हरितद्रव्य असते ते खरडून खाते व त्यामुळे पाने पिवळी तसेच थोडीशी पांढरी व्हायला लागतात व नंतर वाळून जमिनीवर गळून पडतात. त्यानंतर जेव्हा अळ्या मोठ्या होतात तेव्हा संपूर्ण पाने आणि झाडाची कोवळी देठे खातात आणि झाडावर फक्त फांद्या शिल्लक ठेवतात.

तसेच फुले व घाट्याचे देखील प्रचंड नुकसान करतात. आपल्याला माहित आहे की जेव्हा या अळ्या मोठ्या होतात तेव्हा हरभऱ्याच्या घाट्यांना छीद्र करतात व आतील दाणे खाऊन पूर्ण घाटे पोकळ करतात. एक अळी झाडावरील 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते. यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की ही अळी हरभऱ्याचे किती नुकसान करत असेल ते.

घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

1- याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतामध्ये प्रतिएकर इंग्रजी टी आकाराचे 20 पक्षी थांबे लावावेत.

2- तसेच घाटे अळीचे सर्वेक्षण करता यावे याकरिता प्रती एकर दोन कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे.

3- जेव्हा हरभरा पिक फुलोरा अवस्थेमध्ये असते तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा तीनशे पीपीएम अझाडेरेक्टीन पन्नास मिली प्रती दहा लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

4- जेव्हा या आळीची लहान अवस्था असते तेव्हा एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. विषाणूची दहा मिली प्रति दहा लिटर पाणी म्हणजेच दोनशे मिली प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.

5- समजा या अळीने जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर मात्र इमामेक्टिन बेंझोएट पाच टक्के 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल( 18.5% )तीन मिली प्रति दहा लिटर पाणी( प्रति एकर साठ मिली)याप्रमाणे किंवा फ्लूबेंडामाईड( 20 टक्के)पाच ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे( प्रति एकर 125 ग्राम) फवारावे.

(टीप- पिकावर कुठलीही फवारणी करण्याअगोदर कृषी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts