Capacitor For Electric Pump:- बऱ्याचदा कित्येक जणांना अनुभव आला असेल की जेव्हा उन्हाळा सुरू होतो व तेव्हा रब्बी हंगामाची पिके शेतामध्ये बहरलेली असतात. तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता देखील जास्त असते व अशावेळी मात्र विहिरीतील पाण्याचा पुरवठा केला जातो.
परंतु या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये विजेचा वापर होत असल्यामुळे साहजिकच त्याचा दाब रोहित्र तसेच वीजवाहिन्या इत्यादींवर येऊन त्यांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते व बऱ्याचदा या कालावधीतच विहिरीवरील कृषी पंप म्हणजेच मोटारी जळण्याचे प्रमाणात देखील वाढ होते.
तसेच अशाप्रसंगी बरेच जण कृषीपंपांना ऑटो स्विच कनेक्ट करतात. परंतु जेव्हा कृषी पंप एकाच वेळी सुरू होता तेव्हा रोहित्र म्हणजे डीपीवर भार अचानक वाढतो व रोहित्र जळण्याच्या घटना घडतात. अशाप्रकारे रोहित्र जळाल्याने वेळेत वीज पुरवठा होत नाही व त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
याकरिता ऑटो स्विच ऐवजी जर शेतकऱ्यांनी कॅपॅसिटर बसवले तर नक्कीच त्याचा खूप मोठा फायदा होतो. शेतकऱ्यांनी ऑटो स्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवावे व सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन महावितरण देखील करत आहे.
कॅपॅसिटर बसवण्याचा काय होतो फायदा?
कॅपॅसिटर हे एक महत्त्वाचे उपकरण असून जर कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवले तर विद्युत केबल जळण्याचे प्रमाण खूप कमी होते. विद्युत दाब योग्य पद्धतीने राहतो व वीज वापरात बचत होते. तसेच पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होते व त्यामुळे कृषी पंप म्हणजेच मोटारी जळण्याचे प्रमाण कमी होते.
मोटारीला जर कॅपॅसिटर बसवलेले राहिले तर रोहित्रावरील विजेचा भार 30% ने कमी व्हायला मदत होते. त्यामुळे नक्कीच रोहित्र नादुरुस्त होण्याचे किंवा ते जळण्याचे प्रमाण देखील कमी होते. रोहित्र जर योग्य पद्धतीने चालत राहिले तर शेतकऱ्यांना योग्य दाबाचा व अखंडित असा वीजपुरवठा होत राहतो.
त्यामुळे कृषी पंपाच्या क्षमतेनुसार त्याला कॅपॅसिटर बसवणे हे रोहित्र जळणे वा तो नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. इतकेच नाही तर कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीज पुरवठा होत
असेल किंवा रोहीत्र जळाले किंवा नादुरुस्त झाले तर ते दुरुस्त होईपर्यंतचा जो काही कालावधी जातो त्या कालावधीत खंडित वीजपुरवठा इत्यादीच्या समस्या देखील बऱ्यापैकी सुटण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कॅपॅसिटर बसवणे खूप गरजेचे आहे.