कृषी

शेतातील पेरूचे रक्षण व्हावे म्हणून लावले करवंदाची झाडे! परंतु याच करवंदाने उजळवले शेतकऱ्याचे नशीब; आज एकरी मिळत आहे दीड लाखाचा नफा

जेव्हा शेतीमध्ये आपण एखाद्या पिकाची लागवड करत असतो किंवा एखादा प्रयोग राबवतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला त्याचे महत्त्व किंवा त्याची माहिती नक्की असायला हवी तितकी नसते. परंतु अशा प्रकारचे प्रयोग किंवा पिकांची लागवड ही खूप मोठा फायदा देणारी असते.

जेव्हा आपल्याला ही गोष्ट कळते तेव्हा आपण मात्र अशा प्रयोगांना किंवा पिकांच्या लागवडीला खूप महत्त्व देतो व कालांतराने या माध्यमातूनच चांगला पैसा आपल्याला मिळायला लागला. अगदी असाच काहीतरी प्रकार हा हिंगोली जिल्ह्यातील इंजनगाव येथील सदाशिव अडकिने या शेतकऱ्याच्या सोबत घडली.

2016 मध्ये त्यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेल्या पेरूच्या बागेला नैसर्गिक काटेरी कुंपणाची सोय व्हावी म्हणून बांधांवर करवंदाची लागवड केली होती. परंतु पुढे चालून हीच करवंदाची लागवड त्यांना पेरूपेक्षा जास्त उत्पन्न द्यायला लागली.

 करवंदातून हा शेतकरी कमवत आहे लाखोचा नफा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंगोली जिल्ह्यात इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिने त्यांनी 2016 मध्ये त्यांच्या शेतात पेरूची लागवड केली व पिकाचे संरक्षण व्हावे याकरिता त्यांनी नैसर्गिक काटेरी कुंपण तयार करण्याचा निर्णय घेतला व याकरिता करवंदाच्या रोपांची लागवड केली.

करवंदाची रोपे त्यांनी चक्क पश्चिम बंगाल मधून खरेदी केली व स्वतःच्या बांधांवर लावली. परंतु कालांतराने त्या करवंदापासून त्यांना उत्पादन मिळायला लागले. नंतर त्यांच्या लक्षात आले की स्वतःच्या बांधांवरची ही करवंदाची लागवड शेतात का करू नये व त्यांनी चक्क सहा एकर क्षेत्रामध्ये करवंदाची लागवड करण्याचे ठरवले व लागवड केली देखील.

या लागवडीवरच न थांबता त्या पिकाच्या जातीवर त्यांनी संशोधन तसेच ज्यूस, जेली आणि लोणचे तयार करण्यासाठी देखील वेगवेगळे प्रयोग ते करत असून त्यासाठीचा प्रकल्पावर देखील काम सुरू आहे.

त्यामुळे त्यांनी सहा एकर मध्ये करवंदाची लागवड केली आणि आज त्यांचे उत्पादन देशातील अनेक प्रमुख बाजारपेठेंमध्ये जात असून त्यातून त्यांना एकरी दीड लाख रुपयांचा नफा मिळत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या करवंदाला किमान 30 तर कमाल 80 रुपये किलो एवढा बाजार भाव मिळत असून एकरी ते आठ ते नऊ टनांचे उत्पादन घेत आहे.

 अशा पद्धतीने केले विक्री व्यवस्थापन

करवंदाची विक्री व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी प्रोसेसिंग तसेच पॅकिंग आणि महत्वाचे म्हणजे ब्रॅण्डिंग या गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणावर फोकस केला व त्यावर भर दिला. त्यांच्या शेतात पिकलेली करवंद हैदराबाद तसेच पुणे, नासिक, दिल्ली तसेच जयपूर व बेंगलोर या ठिकाणी जातात.

तसेच त्यांनी एका कंपनीशी करार केला आहे व लवकरच ते जॅम, जेली तसेच ज्यूस व लोणचं तयार करणार असून या प्रकल्पाचे 80 टक्के काम देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. करवंदाचे एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे करवंद हे विषमुक्त असते. कारण करवंद पिकवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या खतांच्या आवश्यकता भासत नाही किंवा वापरली जात नाहीत व कीटकनाशक देखील फवारण्याची गरज भासत नाही.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे करवंदाची एकदा लागवड केली म्हणजे 35 ते 40 वर्षे लागवड करण्याची गरज भासत नाही व लागवड खर्च फक्त एकदाच करावा लागतो. लागवडीचा विचार केला तर एकरी एक लाख रुपये खर्च येतो. एकरी त्यांना अडीच ते तीन लाख रुपये नफा मिळत असून खर्च वजा जाता दीड लाख रुपये निव्वळ नफा त्यांच्या हातात राहत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts