Lumpy Skin Disease : लंपी स्किन या आजारामुळे देशात मोठ्या प्रमाणात पशुधनाला हानी पोहोचली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव राजस्थानमध्ये पाहायला मिळाला. आपल्या राज्यात देखील याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला असून यामुळे लाखो पशुधन ग्रसित झाले आहे. या आजाराने हजारोच्या संख्येने गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले आहे.
म्हणून राज्यातील पशुपालकांना याचा मोठा फटका बसला आहे. पशुपालकांनी पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेले पशुधन दगावले असल्याने राज्य शासनाने अशा पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची घोषणा केली आहे.
दरम्यान शासनाकडून शासन निर्णय जारी करून अनुदान देण्याची घोषणा झाल्यानंतर पशुपालकांना प्रत्यक्षात अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात आतापर्यंत या आजाराने पशुधन दगावलेल्या बारा हजार 471 शेतकरी बांधवांच्या खात्यात नुकसान भरपाई म्हणून 33 कोटी 85 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. याबाबत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली.
मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यातील एकूण 35 जिल्ह्याच्या 4001 केंद्रांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. यामध्ये तीन लाख 75 हजार 576 एवढे पशुधन या आजाराने बाधित आहे. बाधित पशुधनापैकी अत्यापर्यंत दोन लाख 96 हजार 574 पशुधन उपचाराने बरे झाले आहे.
तसेच उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यातील खाजगी संस्था, सहकारी दूध संघ, वैयक्तिक पशुपालक यांनी करून घेतलेल्या लसीकरणांनुसार राज्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
दरम्यान राज्यातील ग्रामपंचायतींनी गाव पातळीवर महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनाचा अवलंब करून गोठ्यातील कीटक नियंत्रण आणि निर्जंतुकीकरण या बाबींसाठी राज्यव्यापी मोहीम राबवावी, पशुपालकांनी देखील यामध्ये सहभाग घ्यावा असे देखील आवाहन यावेळी मंत्रिमहोदयांनी केले.
शासकीय व खाजगी पशुवैद्यकांनी सुधारित उपचार प्रोटोकॉल प्रमाणे या आजारावर उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः पशुपालक शेतकऱ्यांकडे जाऊन लसीकरण व औषधोपचार करावेत. राज्यात शासनाकडून मोफत औषधोपचार आणि लसीकरण करण्याची सोय आहे.
यासाठी पशुपालकांनी स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यासाठी सहकार्य करावे. निश्चितच शासनाने लंपी आजाराने दगावलेल्या पशुधनाला मदत जाहीर केली असल्याने पशुपालकांना याचा मोठा दिलासा मिळत आहे.