काही वर्षापासून बदललेली हवामानाची परिस्थिती तसेच वारंवार येणारे अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वारे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक तोट्यात जात आहे. आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा पिकांची काढणी करण्याची वेळ येते म्हणजेच हातातोंडाशी घास येतो व अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पिके जमीनदोस्त होतात व मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
त्यामुळे या सगळ्या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत असून या प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पद्धतीत बदल करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहेच
परंतु पारंपारिक पिकांऐवजी आता भाजीपाला तसेच फळपीकांकडे व त्यासोबतच फुलशेती व रेशीम शेतीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जामदरी या गावचे महेश शेवाळे यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीची निवड केली व या माध्यमातून उत्तम पद्धतीने आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
महेश शेवाळे यांची रेशीम शेती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जामदरी या गावचे महेश कैलासराव शेवाळे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करायचे ठरवले व त्याकरिता रेशीम शेतीची निवड केली.
जेव्हा त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्याकरिता पाच लाख रुपये खर्च करून रेशीम कीटकांसाठी आवश्यक असलेले पाच बाय तीस फूट आकाराचे शेड उभारले व त्यामध्ये लोखंडी रॅक तयार केले. तसेच रेशीम शेतीकरिता तुतीची लागवड करणे गरजेचे होते व याकरिता त्यांनी 31 मार्च 2021 रोजी दोन एकर क्षेत्रावर पट्टा पद्धतीने चार बाय आठ बाय 1.6 अशा प्रकारच्या अंतरावर तुतीची देखील लागवड केली.
तसेच त्याला पाण्याचे व्यवस्थापन करताना पाटपाणी दिले व उच्च गुणवत्तेचा तुती पाला उत्पादित व्हावा याकरिता एकरी एक बॅग डीएपी व 25 किलो युरिया त्यांनी दिला व आजही त्यांचे खत व्यवस्थापन याच पद्धतीचे आहे. त्यांची घरची नऊ एकर शेतीत अगोदर कांदा तसेच मका इत्यादी पिके ते घेत होते व आतापर्यंत शेतीमध्ये तुती आणि रेशीम शेती केली जाते.
वार्षिक बॅचचे नियोजन कसे केले जाते?
यामध्ये ते 150 बाल्य कीटकांची खरेदी करतात व 20 ते 23 दिवस त्यांच्या संगोपन करत रेशीम कोषचे उत्पादन घेतात. दरम्यान रेशीम अळीच्या अवस्थेनुसार एक, दोन तसेच तीन वेळेस त्यांना तुतीचा पाला खायला दिला जातो.
ज्यामध्ये सहा ते सात फीडिंग वर या आळी मोड अर्थात शरीर अवस्था बदलतात व ज्यात शेवटच्या चौथ्या मोडला चंद्रिका पसरवली जाते व अळी रेशीम कोष तयार करते.
रेशीम कोश तयार झाल्यानंतर मजुरांच्या मदतीने हे कोश वेचले जातात व जालना येथील रेशीम बाजारात विकले जातात. अशाप्रकारे योग्य व्यवस्थापन ते बॅचचे ठेवतात व वर्षाला आठ बॅच घेतात.
किती येतो प्रति बॅचला खर्च व किती मिळतो नफा?
यामध्ये बाल्य कीटकांची खरेदी, निर्जंतुकीकरण तसेच शेवटच्या मोल्डला पाला पुरवण्यासाठी लागणारा मजुरीचा खर्च, रेशीम कोष वेचण्यासाठी लागणारे मजूर तसेच जालना येथे विक्री करण्यासाठी येणारा प्रवास खर्च इत्यादी सर्व खर्च मिळून एका बॅच करिता सोळा ते अठरा हजार रुपयांचा खर्च येतो.
त्यासोबत 150 अंडीपुंज मधून उत्पादित होणाऱ्या सरासरी 150 ते 170 किलो रेशीम कोषला 450 ते 600 रुपये दरानुसार मिळणाऱ्या रकमेतून खर्च वजा केल्यास प्रति बॅच त्यांना 45 ते 55 हजार रुपयांचा नफा मिळतो.