Micro Irrigation Scheme:- कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी देखील योजना आहेत व त्यासोबतच पिकांना पाण्याची उपलब्धता व्हावी व कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळवता यावे
त्या दृष्टिकोनातून देखील शासनाच्या अनेक योजना आहेत. पाणी म्हटले म्हणजे शेतासाठी एक आवश्यक घटक असून शेती ही पाण्याशिवाय शक्यच नाही. उपलब्ध पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रति थेंब अधिक उत्पादन व अधिक पीक या अर्थाने सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे.
या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन बसवण्याकरिता अनुदान मिळते. मिळणारे हे अनुदान व त्यासंबंधीचे असलेल्या योजना याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
शासनाच्या महत्त्वाच्या सूक्ष्म सिंचन योजना
1- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना– राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनाकरिता अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देण्यात येते.
जर आपण 2021 ते 2024 या चार वर्षाचा विचार केला तर या योजनेअंतर्गत पूरक अनुदान देता यावे याकरिता राज्य शासनाकडून 464 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून तीन लाख 14 हजार 252 पात्र लाभार्थ्यांना जवळजवळ 418.73 कोटी रुपयांचे पूरक अनुदान देण्यात आले आहे.
2- अटल भूजल योजना– ही योजना राज्यातील 13 जिल्ह्यातील 42 तालुक्यातील जवळजवळ 1339 ग्रामपंचायतीमधील 1440 गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पाच वर्षाच्या कालावधी करिता राबविण्यात येत आहे. अटल भूजल योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्पभूधारक आणि इतर शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाकरिता अनुक्रमे 25 आणि 30 टक्के पूरक अनुदान देण्यात येत आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठे कराल अर्ज?
तुम्हाला देखील या योजनांचा लाभ घेऊन शेतामध्ये ठिबक आणि तुषार सिंचन बसवायचे असेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करून आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करून अर्ज करू शकतात. याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येतो.
या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकरी योजना या पर्यायाची निवड करून स्वतःचा मोबाईलचा वापर करून यासाठी अर्ज करू शकतात. सामुदायिक सेवा केंद्र अर्थात सीएससी केंद्रावर जाऊन किंवा ग्रामपंचायतीमधील सेवा केंद्रावर जाऊन वरील संकेतस्थळाचा वापर करून अर्ज करता येतो.
कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे याकरिता महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणाली अंतर्गत शेतकरी त्यांना पसंतीच्या घटकांची निवड करू शकतात व त्या अंतर्गत अर्ज करू शकतात.