Farmer succes story : देशातील नवयुवक उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात. शिक्षण घेतल्यानंतर मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जाण्याची बहुतेकांना इच्छा असते.
मात्र असे असले तरी ललित देवरा या अवलियाने एमबीए केल्यानंतर कृषी क्षेत्रात (Farming) आपले करियर घडवण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे शेती व्यवसायात या अवलियाने चांगले यश संपादन केले आहे.
शेती व्यवसायात चांगले यश संपादन करून हा अवलिया इतर तरुणांसाठी प्रेरणा बनत आहे. मित्रांनो कठोर परिश्रम आणि स्वतःला झोकून देऊन ललितने प्रतिकूल परिस्थितीत भाजीपाला (Vegetable Crop) आणि इतर पिके घेतलीत.
सध्या ललित पश्चिम राजस्थानची पहिली हायटेक नर्सरी चालवत आहे आणि कृषी पर्यटनाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत आहे. यामध्ये त्यांना साथ दिली आहे त्यांची पत्नी खुशबू देवरा जी की पेशाने सीए आहे.
यामुळे शेतीकडे कल वाढला
जोधपूरपासून 12 किमी अंतरावर असलेल्या सुरपुरा धरणाजवळ राहणाऱ्या ललित देवरा या 33 वर्षीय तरुणाचा हा प्रवास 2012 साली सुरू झाला. आपल्या राज्यातील पुणे येथून एमबीए पूर्ण केले आणि विशेष म्हणजे टॉप-10 विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे नाव होते.
इंटर्नशिप करत असताना शेवटच्या वर्षापर्यंत शेतीचा काही संबंध नव्हता. इंटर्नशिपसाठी त्यांना दररोज 32 ते 33 किलोमीटरचा प्रवास वाघोली शहरापर्यंत दुचाकीने करावा लागला. वाटेत ललित यांची नजर मोठमोठ्या ग्रीन हाऊसवर आणि पॉलीहाऊसवर पडत असे कारण ललित यांनी राजस्थानात असे काही पाहिले नव्हते.
त्यामुळे सुरुवातीला येथे काही मोठा कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी तंबू उभारले गेले असावेत, असे ललित यांना वाटतं असे.
मात्र सलग महिनाभर त्यांच्याकडे बघून समजून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. मग कळलं की ते ग्रीन आणि पॉलीहाऊस आहे. हळूहळू वनस्पतींचा सहवास सुरू झाला. तो भाजीपाला, झाडे पाहायचा, त्यांचा स्वभाव समजायचा आणि थोडा वेळ घालवायचा.
इथूनच ललितचा शेतीकडे कल वाढला, इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर त्याला आठ लाखांच्या पॅकेजमध्ये आयसीआयसीआय सिक्युरिटी रिलेशनशिप मॅनेजर म्हणून नोकरीची ऑफर आली, पण त्याने ती नाकारली.
कारण त्याचे मन आता निसर्गाशी जोडले गेले होते आणि इथून त्याने आपल्या शेतीकडे वाटचाल केली. त्याला दोन कंपन्यांची ऑफर लेटरही आली, पण आता तण आणि मन दोन्ही शेताकडे वळले होते म्हणून त्याने कंपनीची ऑफर देखील स्वीकारली नाही.
शेतीच्या प्रवासाची अशी झाली सुरुवात
जोधपूरला येण्यापूर्वी ललितने एकदा गुजरातलाही भेट दिली होती. ललित सांगतात की, तो गुजरातमध्ये गेला आणि पाहिलं की मेट्रो सिटीमध्ये मोठ्या कंपन्या भाजीपाला उत्पादनातून लाखो रुपये कमावत आहेत, त्यांच्याकडे फारशी जमीनही नाही.
एक ते दोन बिघा जमीनीत आधुनिक पद्धतीने भाजीपाला वर्गीय पिकांची शेती केली जात आहे. बागायती पिके आणि संरक्षित शेती. यातूनच काम करता येईल. इथूनच मग त्याने शेती करायचं ठरवलं.
2013 मध्ये मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केल्यानंतर तो घरी परतला तेव्हा मुलगा चांगली नोकरी करेल या विचाराने आई-वडिल दोघेही आनंदि झाले होते, मात्र ललितने शेती करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा कुटुंबाला धक्काच बसला.
ओळखीचे लोकही टोमणे मारायला मागेपुढे पाहत नव्हते. आपल्या वडिलोपार्जित जमिनीपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. ललित यांच्या वडिलोपार्जित शेतात पारंपारिक पिके घेतली जात होती, मात्र पाण्याअभावी फायदा नगण्य होता. वडील ब्रह्मसिंग यांच्याकडून कुटुंबाच्या 12 बिघापैकी फक्त 400 चौरस मीटर जमीन मागितली होती.
सुरुवातीला ललित यांना पॉलिहाऊस शेती मध्ये नुकसान सहन करावे लागले. मात्र नंतर ललित यांनी जयपूर येथून प्रशिक्षण घेतले. त्या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र मध्ये पॉलिहाऊस शेती चे सर्व बारकावे समजून घेतले. या ठिकाणी त्यांनी झाडे कशी वाढतात, कोणते रोग होतात, रोगांपासून त्यांचे संरक्षण कसे करावे. एकंदरीत वनस्पतीचे संपूर्ण शास्त्र समजून घेतले.
ललित देवरा यांनी सर्वप्रथम आपल्या शेतात शेडनेट हाऊस लावून भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. हळूहळू पॉलीहाऊसचीही स्थापना झाली. उद्यान विभागाकडून अनुदान घेऊन काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
कृषी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहिले. काकडीचे टर्की मधून बियाणं मागवल. 2016 मध्ये अर्धा बिघा जमिनीवर एकूण 28 टन काकडीचे उत्पादन झाले. चार लाख रुपये खर्च आला आणि पहिल्या लागवडीतच 12 ते 13 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.
शेतीमध्ये भाजीपाला उत्पादनावर भर देण्यात आला. त्याच्या शेतावर हरितगृह बांधले. ठिबक सिंचन यंत्रणा बसवली. काकडीनंतर लाल, पिवळी व हिरवी शिमला मिरची, टोमॅटो इ. पिकांची शेती करण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस शेतीत नफा वाढला, त्यामुळे टोमणे मारणारेही आता त्यांना साथ देताना दिसत होते.
ललित आता पपई, डाळिंब आणि स्ट्रॉबेरीचीही लागवड करत आहेत. संपूर्ण फॉर्मवर ठिबक सिंचन संयंत्र बसविण्यात आले. त्यांचे स्वरूप हे एकात्मिक कृषी व्यवस्थापनाचे उदाहरण आहे. गांडुळ युनिटही बसवण्यात आले आहे.
कृषी अभियांत्रिकीसाठी युनिट्स देखील आहेत, जिथे लहान आणि मोठी उपकरणे देखील बनविली जातात. शेतीतील वाढत्या रसायनांचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.
याशिवाय त्यांनी नर्सरी देखील स्थापन केली आहे. नर्सरीतही त्यांना चांगला बक्कळ पैसा मिळत आहे. गतवर्षी त्यांनी नर्सरीतून एक कोटी रुपयांची उलाढाल केली होती. ललित यांच्यामते सुरुवातीला नर्सरीतून तीस लाखांची उलाढाल होत असे मात्र आता यामध्ये मोठी वाढ झाली असून उलाढाल एक कोटींच्या वर गेली आहे. निश्चितच ललित यांनी शेती व्यवसायात केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी सिद्ध होणार आहे.