Weather Update : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा पाऊस काही पिच्छा सोडायला तयार नाही. या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते.
यातून कसाबसा सावरत शेतकरी राजा रब्बी हंगामाकडे वळला मात्र आता रब्बी हंगामात देखील पाऊस शेतकऱ्यांचा पाठलाग करत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम होते.
दरम्यान आता प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढत असून यामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे. आधीच खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून झालेल्या नुकसानीची भरपाई भरून निघेल अशी आशा होती.
मात्र आता पुन्हा एकदा रब्बी हंगामात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता पाहता या हंगामात देखील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात अजूनही खरीप हंगामातील कापूस पीक वावरातच उभे असून कापसाच्या वेचण्या बाकी आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पावसाची शक्यता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार सहा आणि सात डिसेंबर रोजी राज्यात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. निश्चितच अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.