Onion Crop Management:- कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पिक असून ते प्रामुख्याने खरीप व रब्बी अशा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. परंतु आपण कांद्याचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून हवामानात झालेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस किंवा धुके इत्यादीमुळे कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणी वगैरे वरचा खर्च तर वाढतोच परंतु व्यवस्थापन चूकल्यामुळे बऱ्याचदा याचा उत्पादनावर मोठा फटका बसताना दिसून येतो.
या रोगांमध्ये जर आपण पाहिले तर करपा रोग हा मोठ्या प्रमाणावर आढळून येतो व हा एक गंभीर असा रोग असून यामुळे कांदा याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटते. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण करपा रोगाचे प्रकार व त्यावरील उपाय योजना याबद्दल महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत.
कांद्यावरील करपा रोगाचे प्रकार
1- अल्टरनेरिया करपा– खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे या प्रकारचा करपा रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर होतो. या प्रकारामध्ये सुरुवातीला कांद्याच्या पातीवर लहान, खोलगट असे पांढरे चट्टे पडतात व ही सुरुवात प्रथम शेंड्याकडून होते व खालच्या भागाकडे सरकत जाते.
या चट्ट्याचा मधील भाग जांभळट लालसर रंगाचा होतो आणि कडा पिवळसर दिसायला लागतात. हवामान जर दमट असले तर या प्रकारचा करपा मोठ्या प्रमाणावर वाढतो व चट्याच्या ठिकाणी तपकीरी किंवा काळपट बुरशीची वाढ व्हायला लागते. त्यामुळे पात शेंड्याकडून जळु लागते.
तसेच बीजोत्पादनासाठी जर कांदे लावले असेल तर अशा प्रकारच्या लावलेल्या कांद्याच्या पातीवर हा रोग आला तर याची सुरुवात दांड्यावर होते व गोंड्यात बी भरत नाही व दांडे खाली कोलमडतात. आधी सुरुवातीला जर हा रोग आला तर पात जळते व पिकाची वाढ होत नाही व कांदा न पोसल्यामुळे चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते. जेव्हा कांदा पोसत असतो तेव्हा जर हा रोग आला तर बुरशीचा प्रादुर्भाव थेट कांद्यापर्यंत पसरतो व त्यामुळे कांदा सडायला लागतो व असा कांदा चाळीत देखील टिकत नाही.
2- कोलीटोट्रीकम करपा– यालाच काळा करपा रोग असे देखील म्हणतात व याचा प्रादुर्भाव खरीप हंगामामध्ये दिसून येतो. या प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर सुरुवातीला पानावर आणि मानेवर वर्तुळाकार काळे डाग पडायला लागतात. प्रामुख्याने जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो व पाने करपतात व कंद सडतो.
3- स्टेम्फीलीयम करपा– हा तपकिरी करपा म्हणून ओळखला जातो व रब्बी हंगामात याचा प्रादुर्भाव दिसून येतो. जेव्हा सुरुवातीला याचा प्रादुर्भाव होतो तेव्हा पानावर तपकिरी चट्टे पडतात व या चट्ट्यांचे प्रमाण बुंध्याकडून शेंड्याकडे वाढत जाते व पाने तपकिरी पडून वाळायला लागतात. पात सुरकुतल्यासारखी दिसायला लागते व शेंडे जळाल्यासारखे दिसतात.
या उपायोजना ठरतील फायद्याच्या
1- पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी उपाययोजना– बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी कॅप्टन दोन ग्रॅम + बाविस्टीन दोन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात कांद्याच्या बियाण्याला बीजप्रक्रिया करून घ्यावी. तसेच पिकाची फेरपालट करणे गरजेचे असून ज्या जमिनीमध्ये तुम्हाला लागवड करायची आहे ती जमीन उन्हाळ्यात चांगली नांगरून घ्यावी व तापू द्यावी.
रोपवाटिका नियोजन
1- रोपवाटिकेत रोपांची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसांपासून मॅन्कोझेब 25 ग्रॅम+ डायमेथोएट 15 मिली+ स्टिकर द्रव्य दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी.
2- तसेच कांद्याची पून:लागवड करण्यापूर्वी कांदा रोपांची मुळे मॅन्कोजेब 25 ग्रॅम दहा लिटर पाणी घेऊन द्रावण तयार करावे व या द्रावणात पाच ते दहा मिनिटे बुडवून मग लागवड करावी.
लागवडीनंतरचे नियोजन
1- लागवडीनंतर करपा आणि फुलकिडे नियंत्रणाकरिता लागवड केल्यानंतर रोगांची लक्षणे दिसायला लागली तर दहा दिवसांच्या अंतराने अझोक्सिस्टॉबीन दहा मिली किंवा टॅब्युकोनॅझोल दहा मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा करपा आणि काळा करपा नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात मिसळून करावी
किंवा मॅन्कोझेब 30 ग्रॅम + फिप्रोनील 5 एससी 15 मिली प्रोफेनोफॉस 50 इसी 10 मिली किंवा कार्बोसल्फान 25 ईसी दहा मिली किंवा सायपरमेथ्रीन पाच मिली अधिक स्टिकर दहा मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करणे गरजेचे असते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे याकरिता तुम्ही व्हर्टिसिलियम किंवा मेटॅरिझम हे जैविक बुरशीनाशक पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पंधरा दिवसांच्या अंतराने तीन फवारणी घेऊ शकतात.
अशाप्रकारे तुम्ही तज्ञांच्या मार्गदर्शनाने जर नियोजन केले तर नक्कीच या रोगांवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकतात.