Onion Farming : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कांद्याची शेती पाहायला मिळते. सध्या कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे मात्र तरीदेखील शेतकरी बांधवांचा मदार हा कांदा पिकावरच आहे.
कांदा बाजारभावाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो, पण असे असतानाही नासिक अहमदनगर पुणे सोलापूर सांगली सातारा, खानदेश, मराठवाडा, विदर्भ जवळपास राज्यातील सर्वच भागात या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कांदा पिकावर येणाऱ्या काही रोगांची माहिती जाणून घेणार आहोत तसेच या रोगांवर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवले पाहिजे याविषयी देखील थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कांदा पिकावर प्रामुख्याने येणारे रोग आणि त्यावरील नियंत्रण पद्धत
थ्रिप्स कीटक :– कांदा हे एक नगदी पीक असून यावर कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळतो. थ्रीप्स हे देखील असच एक कीटक आहे. हे कीटक कांद्याच्या पातीमधील रस शोषून घेतात. परिणामी कांदापातीवर चांदीसारखे चमकदार असे पट्टे किंवा तपकिरी डाग तयार होतात.
यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. यामुळे कांदा पीक वाढीवर विपरीत परिणाम होतो. हे कीटक अगदी लहान पिवळे किंवा पांढरे रंगाचे असतात. हे कीटक प्रामुख्याने पानांच्या तळाशी किंवा पानांच्या मध्यभागी आपली उपजीविका भागवत असतात. या कीटकांवर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं.
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या कीटकाच्या नियंत्रणासाठी, निंबोळी तेलावर आधारित कीटकनाशके किंवा इमिडाक्लोप्री कीटकनाशक 17.8 SL फवारणी कांदा उत्पादकांनी केली पाहिजे. औषधाचा डोस 125 ml./हेक्टर एवढा असावा. 500-600 लिटर पाण्यात मिसळून ही फवारणी शेतकऱ्यांनी करावी असा सल्ला देण्यात आला आहे.
जांभळा डाग/पर्पल ब्लॉच रोग :- कांदा पिकावर येणारा हा एक मुख्य रोग आहे. हा एक बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव हा अतिवृष्टीमुळे आणि कांदा लागवड दाट झाली त्यावेळी सर्वाधिक पाहायला मिळतो. या रोगामुळे कांदा पातीवर जांभळे ठिपके तयार होतात. यामुळे याला पर्पल ब्लॉचं असं नाव पडल आहे. या रोगाचा प्रादुर्भावामुळे कांदा पिकावर विपरीत परिणाम होतो.
यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटते परिणामी उत्पादनात घट होते. अशा परिस्थितीत या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी लक्षणे दिसल्यास 10 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब (2.5ग्रॅम/लिटर पाणी) फवारणी करावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. या बुरशीनाशकांमध्ये सॅनोविट, ट्रायटोन किंवा ऑर्डिनरी गम सारखी चिकटद्रव्ये म्हणजे स्टिकर जोडणे आवश्यक आहे जेणेकरून प्रभावी नियंत्रणासाठी याच द्रावण पानांना चिकटू शकेल.