Onion Crop Management:- महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड सध्या मोठ्या प्रमाणावर केली जात असून अगोदर जर आपण बघितले तर नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठे उत्पादन घेतले जायचे व द्राक्ष आणि कांदा पिकाचे आगार म्हणून नाशिक जिल्ह्याला आजही ओळखले जाते.
तसेच सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. काही वर्षांपासून जर आपण बघितले तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील कांद्याच्या लागवडीत आता वाढ होताना दिसून येत आहे. कांदा पिक जर बघितले तर शेतकऱ्यांसाठी हे एक फायद्याचे व नगदी पीक म्हणून ओळखले जाते.
परंतु बऱ्याचदा बाजारभावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. परंतु तरी देखील कांदा पट्ट्यामध्ये शेतकरी कांदा लागवड ही करतातच. कांदा पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर कांद्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात व त्यांचे व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे असते.
या रोगांच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितले तर कांदापातीवर पिळ पडणे हा देखील एक रोग असून यामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता असते. तसे पाहायला गेले तर कांदा उत्पादक शेतकरी या रोगामुळे खूपच त्रस्त असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे या रोगावर नियंत्रण कसे मिळवावे? त्याबद्दलची थोडक्यात माहिती बघू.
कांदा पिकावर पीळ रोग येण्याची कारणे कोणती?
जर आपण कांदा रोगावर येणाऱ्या पिळरोगाच्या संदर्भात बघितले तर प्रामुख्याने हा रोग येण्यामागील कारणे ही…
1- हा रोग प्रामुख्याने पिकाच्या अवशेषांमधून आणि नंतर रोपांच्या किंवा कांद्याच्या माध्यमातून पसरतो.
2- तसेच कांदा रोपवाटिकेसाठी जर अशुद्ध आणि दर्जेदार नसलेल्या बियाण्याचा वापर केला तर या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कारण अशा प्रकारच्या बियाणामुळे रोपांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन कांदा पिकावर पीळ पडताना दिसून येतो.
पिकावर या रोगाच्या प्रादुर्भावाची सुरुवात कशी होते?
साधारणपणे अगोदर पिकावर काळी बुरशी वाढायला लागते व ती हळूहळू कंदापर्यंत पोहोचते. ज्या ठिकाणी पाणी नेहमी साचते अश्या ठिकाणी हा प्रकार जास्त पाहायला मिळतो. त्यामुळे कांदा हा पोसला जात नाही आणि काढणीपर्यंत कांदा पिक सडायला सुरुवात होते.
अगदी सुरुवातीला कांद्याच्या पातीवर पांढरे ठिपके दिसायला लागतात व नंतर ते पिवळ्या रंगात रूपांतरित होऊन सर्व पातळीवर ही ठिपके पसरतात. रोगाची तीव्रता जास्त वाढते तेव्हा कांद्याची मान लांब व्हायला सुरुवात होते व पुढील काळामध्ये कांद्याची मान वाकून जमिनीवर पसरायला लागते.
हा रोग पसरण्यामागील प्रमुख कारणे कोणती?
कांद्यावरील पिळरोग पसरण्यामागील किंवा त्याच्या प्रादुर्भावा मागे जर आपण प्रमुख कारणांचा शोध घेतला तर प्रामुख्याने अँथ्रोक्नोज या बुरशीमुळे होतो व सतत जेव्हा पावसाचे वातावरण असते किंवा पाऊस पडत असतो तेव्हा अशा वातावरणात वाढणाऱ्या आद्रतेमुळे देखील या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
या रोगावर नियंत्रण कसे करावे?
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अगोदर पिकाची फेरपालट करणे गरजेचे आहे.
2- तसेच शेतामध्ये जर जुन्या पिकांचे अवशेष असतील तर ती वेचून बाहेर काढून स्वच्छ करून घेणे खूप गरजेचे असते.
3- तसेच बीज प्रक्रिया करायची असेल तर त्याकरिता कार्बन्डेझीम या बुरशीनाशकाचा वापर करावा. तसेच रोपांची पुनर लागवड करण्या अगोदर रोपप्रक्रिया करताना देखील याच बुरशीनाशकात रोपांची मुळे दहा ते पंधरा मिनिटे बुडवून नंतर पुनर लागवड करावी.
4- तसेच जैविक नियंत्रण करायचे असेल तर यामध्ये बियाणे टाकल्यानंतर चार ते सहा दिवसांनी ट्रायकोडर्माची एक किलो प्रति एकर प्रमाण घेऊन आळवणी करावी. पुनर लागवड असेल तर हे प्रमाण पाटपाणी, ड्रिप किंवा तुषार सिंचन असेल तर त्याद्वारे सिंचनातून द्यावे.
5- बियाणे टाकल्यावर किंवा पुनर लागवड नंतर बरोबर पंधरा दिवसांनी मॅन्कोझेब दीड ग्रॅम प्रतिलिटर इतके घेऊन फवारणी करून घ्यावी. तसेच दर दहा दिवसांनी आलटून पालटून बुरशी नाशकाच्या फवारण्या कराव्यात.