Onion Price News : गेल्या काही दिवसांपासून बाजारात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती मात्र भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कांद्याला भाव मिळेल या आशेने उन्हाळी कांदा साठवणूक करून ठेवला होता. मात्र अद्यापही कांद्याला भाव मिळत नाही.
शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा सडायला लागल्याने शेतकऱ्यांना आता दुहेरी नुकसान होताना दिसत आहे. सध्या हवामान बदलामुळे साठवलेला कांदा जलद गतीने खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कारण जर हा कांदा बाजारात विक्रीसाठी नेला तर त्याचा खर्च देखील निघणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची साठवणूक करून ठेवलेली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अजूनही शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा ६० टक्के आहे. तसेच लवकरच खरीप हंगामातील कांद्याची लागवड सुरु होईल. त्यामुळे यंदाही कांद्याला बाजारभाव मिळणार नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
शेतकरी काय म्हणाले?
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पंडित सांगतात की त्यांनी रब्बी हंगामासाठी 500 क्विंटल कांद्याचा साठा केला आहे. भाव वाढतील तेव्हा विक्री होईल या आशेने कांदा ठेवला आहे. मात्र आता हवामानातील बदलामुळे कांदा सडू लागला आहे.
आता बाजारात साठवलेला कांदा विकायला सुरुवात करणार असल्याचे पंडित यांनी सांगितले आहे. कारण आता कांदा जास्त काळ ठेवता येत नाही. खरीप हंगामातील पावसामुळे आणखी कांदा खराब होण्याची शक्यता आहे असेही ते म्हणले.
कमी किमतीत विकण्याची सक्ती
नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या ६० टक्के कांद्याची साठवणूक शिल्लक आहे. मात्र हा कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना कमी भावामध्ये हा कांदा विकावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. सध्या बाजारात कांद्याचा भाव 300 रुपयांपासून ते 700 रुपये प्रति क्विंटल सुरु आहे.
शेतकऱ्यांचे किती नुकसान?
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले होते. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळे या पावसामध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मात्र यामधून वाचलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी नेला मात्र त्यालाही भाव मिळाला नाही. म्हणून शेतकऱ्यांनी तोच कांदा साठवणूक करून ठेवला आहे मात्र त्यालाही भाव मिळत नाही आणि तो कांदा सडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात संकटाना सामोरे जावे लागणार आहे.