कृषी

Onion Rates : कांदा करतोय शेतकऱ्यांचं नुकसान : अठरा गोण्यांचे मिळाले चारशे रुपये !

Onion Rates : लिलाव प्रक्रियेस झालेला उशीर, व्यापारी प्रत्यक्ष उपस्थित नसणे तसेच दरही कमी मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी तिसगाव ( ता. पाथर्डी) येथील उपबाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ कांदा पेटवून आंदोलन केले.

दरम्यान, बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पदभार घेतला. त्यानंतर आंदोलन झाल्याची माहिती मिळाल्याने ते तत्काळ तिसगाव येथे आले. पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय चर्चा घडवून आणली.

त्यानंतर लगेच लिलाव प्रक्रिया राबविली. दोनशे रुपये ते एक हजार रुपये प्रतवारीनुसार कांद्याला दर मिळाले. मागील काही दिवसांत पार पडलेल्या लिलावाच्या तुलनेत हे दर बरे असल्याचे सांगत काही शेतकऱ्यांनी संचालक मंडळाकडे समाधान व्यक्त केले.

दरम्यान, रविवारी लिलाव झालेल्या कांदा गोण्यांची पट्टी आणण्यासाठी आलेले मनोज ससाणे यांना अठरा गोण्यांची चारशे रुपये पट्टी मिळाली. कांदा विक्रीतून गाडीभाडेही न निघाल्याने ससाणे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत पेट्रोल गोण्यांवर टाकून तो पेटविला.

यावेळी शेतकऱ्यांनी घोषणा देत भावना व्यक्त केल्या. यावेळी शेतकरी अनिल वाघमारे, युवराज मरकड, दीपक मरकड, सुनील लवांडे, लियाकत शेख, संदीप आव्हाड, अर्षद शेख, संचालक वैभव खलाटे, शेषराव कचरे, अरूण रायकर, जिजाबा लोंढे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Onion rates

Recent Posts