Onion Market : काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट विस्कळीत झाले होते आणि आता कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. नवरात्र संपताच 20 ते 25 रुपये किलोने विकला जाणारा कांदा अचानक दुपटीने वाढला. परिस्थिती अशी आहे की, आता अनेक ठिकाणी एक किलो कांदा ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे.
उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र असून कांदा पाच हजारी पार करून रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे.
सटाणा बाजार समितीत बुधवारी (दि. २५) क्विंटलला ५,५५० रुपये सर्वाधिक भाव मिळाला. दसऱ्याला सुटी असल्याने सोमवारी येथे ४,७०० रुपये भाव होता. एका दिवसात भावात १५.३१ टक्क्यांनी वाढ झाली.
नाशिकमध्ये किरकोळ बाजारात कांदा ५० ते ५५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत कांद्याला क्विंटलला सात हजारापर्यंत भाव मिळण्याची चिन्हे आहेत..
लाल कांद्याचे अत्यंत किरकोळ प्रमाणात आगमन झाले असून त्याला ३८०० रुपये प्रति क्विंटलचा भाव लासलगाव बाजार समितीत मिळाला. कमी पावसामुळे लाल कांदा बाजारपेठेत येण्यास उशीर होणार आहे.
उन्हाळ कांद्याच्या दरात रोज ३०० ते ४०० रुपयांची वाढ होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने जेमतेम कांदा शिल्लक आहे व जो आहे तो खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
मे, जून, जुलैमध्ये अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांना कांदा विक्री करावा लागला होता व आता चांगले भाव जरी मिळत असले तरी यातून जेमतेम उत्पादन खर्च निघू शकेल अशी परिस्थिती आहे.
यंदा पावसाने दीर्घ ओढ दिल्याने खरीप कांद्याचे रोप खराब झाले.पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी लेट खरीप कांदाही केला नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव, कळवण, देवळा, चांदवड, मनमाड, सिन्नर, येवला या बाजार समित्यांमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात कांदा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आगामी कांदा आवक लक्षात घेता शेतकऱ्यांनी टप्याटप्यांनी उन्हाळ कांद्याची विक्री सुरू केली आहे.