Farmer Success Story:- पारंपारिक पिकांपेक्षा याबद्दल त्या हवामान परिस्थितीत शेतीमधील पीक लागवडीच्या पद्धती आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरताना दिसून येत आहे. बाजारपेठेची देखील परिस्थिती आता खूप मोठ्या प्रमाणावर बदलली असून तसेच कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने देखील आता शेती क्षेत्रामध्ये खूप मोठा सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे.
पारंपारिक पिकांऐवजी शेतकरी आता फळ पिकांकडे खूप मोठ्या प्रमाणात वळले असून कमीत कमी कालावधीत उत्तम नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेत आहेत व बाजारपेठेचा अभ्यास करून केलेल्या नियोजनामुळे दर देखील चांगले मिळाल्याने आर्थिक उत्पन्न देखील लाखोत मिळत आहे.
याच मुद्याला धरून जर आपण लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील प्रयोगशील शेतकरी गिरीधर बोडके यांची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे. त्यांनी फळबाग लागवडीकडे वळून
पपईची लागवड केली आणि त्या माध्यमातून त्यांनी भरघोस उत्पादन घेऊन लाखो उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.
पपई लागवडीतून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर जिल्ह्यात असलेल्या देवणी तालुक्यातील धनगरवाडी या गावचे शेतकरी गिरीधर बोडके त्यांच्याकडे एकूण दहा एकर शेती आहे. ते अगोदर संपूर्ण क्षेत्रावर पारंपारिक पिके घेत होते. परंतु यातून खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ न बसल्याने काहीतरी वेगळे करावे हा विचार त्यांच्या मनात सुरू झाला.
यातूनच प्रेरणा घेत त्यांनी त्यांच्या दहा एकर क्षेत्रापैकी चार एकर क्षेत्रावर पपई लागवड करण्याचे ठरवले व 2023 च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी पपईच्या चारशे रोपांची लागवड केली. त्यांच्या या धनगरवाडी किंवा देवणी तालुक्याचा जर आपण पाण्याचा विचार केला तर या ठिकाणी धनेगाव बॅरेज बॅक वॉटर असल्यामुळे धनगरवाडी शहरामध्ये या बॅरेजमधून सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असल्याने गिरधर अण्णांसह इतर शेतकरी देखील आता वेगवेगळ्या फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.
जुलै महिन्यापासून त्यांच्या पपई बागेची काढणी सुरू झालेली आहे. काढणी करून ते पपई वलांडी बाजारपेठेमध्ये विकत असून या फळाला चाळीस रुपये प्रति किलो असा उत्तम दर मिळत असल्याने चांगला आर्थिक फायदा देखील मिळत आहे.
जुलै महिन्यापासून या पपईची तोडणी सुरू झाली असून आतापर्यंत त्यांना साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे व अजूनही पंधरा महिन्याचे पीक असल्याने त्यातून आठ लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
सध्या पपईला किरकोळ बाजारामध्ये 40 ते 45 रुपयांचा दर मिळत असला तरी नागपूर तसेच पुणे व मुंबई, सोलापूर आणि निलंगा येथील व्यापारी हे ठोक स्वरूपात 25 ते 30 रुपयाचा भाव देऊन पपईचे खरेदी करत आहेत.
कुटुंबाची मिळाली सार्थ साथ
गिरीधर बोडके यांना या सगळ्या कामांमध्ये त्यांच्या दोन्ही मुलांची खूप मोलाचे साथ मिळाली व त्यांच्या मदतीने त्यांनी शेतीची कामे केली व मजुरांच्या समस्येवर देखील मात करण्यात यश मिळवले.
पपई सोबतच त्यांनी मागच्या वर्षापासून चिकू, लिंबू तसेच आंबा आणि जांभूळ लागवडीचा प्रयोग देखील यशस्वीपणे राबवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गावचे व आजूबाजूचे शेतकरी देखील आता त्यांच्याकडून माहिती आणि प्रेरणा घेऊन आपल्या शेतामध्ये नवनवीन फळबाग लागवडीचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.