कृषी

पावसाने हलकाणी दिल्याने आगाऊ पिक विमा भरपाई द्या

Agricultural News : तालुक्यातील सर्वच मंडलात मागील २५ दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनात मोठी घट होणार असल्यामुळे परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आगाऊ पिकविमा भरपाई द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव मंडलात २५ दिवस, कोपरगाव मंडलात २३ दिवस, रवंदा मंडलात २३ दिवस, पोहेगाव मंडलात २१ दिवस, दहेगाव मंडलात १३ दिवस व मतदार संघातील राहता तालुक्यातील पुणतांबा मंडलात देखील पावसाचा खंड पडला आहे. त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिकांना बसणार आहे.

खरीप हंगामातील उत्पादन हे जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कोपरगाव तालुक्यातील ३३ हजार ४८८ शेतकऱ्यांनी ३८१२०. ४७ हेक्टर क्षेत्रावर व पुणतांबा मंडलात देखील ११ हजार ५७४ शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केलेली आहे.

लहरी हवामानाचा फटका पिकांना बसून नुकसान होवू नये, यासाठी कोपरगाव मतदार संघातील एकूण ४५,०६२ शेतकऱ्यांनी बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग, कांदा आदी पिकांचे ६४,०२३ पिक विमा अर्ज भरलेले आहे.

शासन निर्णय व पिक विम्याच्या तरतुदीनुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल, तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे.

या तरतुदीनुसार कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने आगाऊ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

तसेच शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई तातडीने मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ पंचनामे करावे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील कृषी महसूल विभागाचे पथक तयार करण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने सूचना कराव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे पत्राद्वारे आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts