Pik Vima : भारत कृषीप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या थाटामाटात मिरवतो. मात्र कृषीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, यंदा देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी देखील बहुतांशी शेतकऱ्यांना बहुतांशी शेतकरी बांधवांना मदत मिळालेली नाही.
त्यातच ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे त्यांची देखील पिक विमा कंपन्यांकडून थट्टा माजवली जात आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे.
हजारो रुपयांचे नुकसान झालं असताना शेतकऱ्यांना मात्र 50-60 रुपयांची भरपाई दिली जात आहे. भंडारा जिल्ह्यात पिक विमा कंपन्यांचा हा अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील मौजे मोहाडी येथील विश्वास पाटील नामक शेतकऱ्याला मात्र 60 रुपये एवढी पिक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली आहे.
यामुळे शेतकऱ्यांकडून पिक विमा नेमका शेतकऱ्यांसाठी आहे की पिक विमा कंपन्यांसाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विश्वास पाटील यांनी खरीप हंगामात आपल्या तीन एकर क्षेत्रात धान पीक लावले होते. यासाठी त्यांनी 50 हजार रुपये खर्च केले होते. याचा त्यांनी पिक विमा देखील उतरवला होता.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टी झाली भंडारा जिल्ह्यातही याची नोंद झाली. त्यात विश्वास यांच तीन एकरावरील भात पीक खराब झाले. पिक विमा काढला असल्याने त्यांनी संबंधित पिक विमा कंपनीला पूर्वसूचना दिली. त्या अनुषंगाने पंचनामे झाले.
आता, नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले ते झाले मात्र पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळेल आणि आपल्याला दिलासा लाभेल असा शेतकऱ्याला वाटत होतं. मात्र झालं काही औरंच मा कंपनीने नुकसान भरपाई दिली ती फक्त 60 रुपयाची.
यामुळे एवढ्या रकमेचे काय लोणचे घालायचे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 50 हजार रुपये खर्च करून भात पीक लागवड केली. विम्यासाठी 820 रुपयांचा प्रीमियम भरला अन आता नुकसान भरपाई म्हणून 60 रुपये मिळाले असल्याने बळीराजाचा हा कसला तळतळाट कंपन्यांनी माजवला आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान आता मिळालेली ही नुकसान भरपाई विश्वास पाटील पिक विमा कंपनीला ओवाळणी म्हणून परत करणार आहेत. निश्चितच एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि असला भीकविमा देऊन पिक विमा कंपन्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.