Pipeline Subsidy:- कृषी क्षेत्राकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या जात असून या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढावे व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा हा दृष्टिकोन आहे. जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये मुबलक प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे व त्याकरिता देखील शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत.
केंद्र सरकार सोबतच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देखील राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळाव्यात याकरिता मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना यासारख्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. आता सिंचनाच्या बाबतीत पाहिले तर मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक आणि तुषार सिंचन यासारख्या अनेक सिंचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या योजना शासनाकडून राबविण्यात येत असून त्यातीलच एक योजना म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना ही होय. या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरिता अनुदान देण्यात येते.
महाराष्ट्र शासनाची पाईपलाईन अनुदान योजना
महाराष्ट्र शासनाच्या पाईपलाईन अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येणार असून साधारणपणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. साधारणपणे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरिता 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते. म्हणजेच साधारणपणे देण्यात येणारे हे अनुदान 50% किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत असणार आहे. साधारणपणे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधू 50 टक्क्यांपर्यंत पाईपलाईन करण्याकरिता अनुदान मिळवू शकतात.
पाईपलाईन अनुदान योजनेचा कोणाला मिळतो?
या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद आहे किंवा त्याच्या शेतामध्ये इतर कोणत्याही सिंचन सुविधेची नोंद आहे जसे की यामध्ये आपण शेततळे, विहीर किंवा इतर सिंचन पद्धतींचा समावेश करू शकतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच एकंदरीतपणे या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा उपलब्ध स्त्रोत किंवा सिंचनाचा स्त्रोत असणे गरजेचे आहे.
पाईपलाईन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया कशी आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे व हा अर्ज शेतकरी बंधू महाडीबीटी पोर्टल वर करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर त्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.
या लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होते व या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येते व त्यासंबंधीचा एसएमएस देखील शेतकऱ्यांना प्राप्त होतो. जेव्हा लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची यामध्ये निवड होते तेव्हा महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते.
पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्र लागतात?
महाराष्ट्र शासनाच्या पाईपलाईन अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर संबंधित अर्जदार शेतकऱ्याकडे सातबारा आणि आठ अ चा उतारा, बँकेचे पासबुक तसेच आधार कार्ड, आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावे, पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आणि पाईप खरेदी केल्याची बिले इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागतात.