Poultry Farming:- सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे बरेचदा आपल्याला शेती तोट्यात जाताना दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिरता राहण्यासाठी शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे. तसे पहिला गेले तर पशुपालन आणि कुक्कुटपालन यासारखे जोडधंदे शेतकरी करतातच.
आता अनेक शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्यांकडे वळताना आपल्याला दिसून येत असून यामध्ये कुक्कुट पालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात आहे. त्यामध्ये बहुसंख्य शेतकरी ब्रॉयलर कोंबडी पालन करार पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आता करत आहेत.
परंतु त्यासोबतच देशी कोंबडी पालन करून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. याच प्रकारे जर आपण अकोला जिल्ह्यातील निपाणा येथील बबन हक या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर यांनी घरचे दहा एकर शेती सांभाळत अंडी व चिकन या दृष्टिकोनातून देशी कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारला आहे. त्यांची यशोगाथा आपण बघणार आहोत.
बबन हक
यांची यशोगाथाअकोला जिल्ह्यातील निपाणा येथील बबन हक रहिवाशी असून त्यांच्याकडे एकूण दहा एकर शेती आहे व सध्या ते शेतीसोबतच पूरक व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांनी अर्थशास्त्र विषयांमध्ये एमए केले असून कृषी विषयामध्ये पदविका अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे.
त्यासोबतच कुक्कुटपालनाकरिता आवश्यक असलेले प्रशिक्षण त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असलेले ऍग्री बिझनेस इंक्युबॅशन सेंटर मध्ये घेतलेले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाच्या उभारणीबाबत जी काही माहिती मिळाली त्या माहितीचा उपयोग करून त्यांनी हा व्यवसाय उभारला.
या माध्यमातूनच त्यांना एक लाख 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देखील व्यवसाय करिता मिळाले. त्यांच्याकडे मध्यम स्वरूपाची जमीन असून चार एकर बागायती आहे तर उरलेले क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे यातून पुरेसा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे त्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली व 2019 मध्ये देशी कोंबडी पालन सुरू केले.
यामध्ये अंडी व चिकन उत्पादन या दृष्टिकोनातून त्यांनी अंड्यांकरिता कावेरी जातीच्या पाचशे कोंबड्या नगर भागातून आणल्या व चिकन करीता सोनाली या जातीच्या 1000 कोंबड्या आणल्या व व्यवसायाला सुरुवात केली. यातील अंड्यांसाठीची जी काही कावेरी जात आहे ती पाच ते सहा महिन्यांनी अंडी द्यायला सुरुवात करते
व दोन वर्षापर्यंत व्यावसायिक पद्धतीने अंडी देतात. या माध्यमातून त्यांना सरासरी दिवसाला 250 ते 300 अंडी उत्पादन मिळते. तसेच चिकनसाठी असलेली सोनल या जातीच्या पक्षांच्या 60 ते 70 दिवसांमध्ये बॅच तयार होते व या साठ ते सत्तर दिवसात एक किलो पर्यंत या जातीचे वजन मिळते.
अशा पद्धतीने केले आहे नियोजन
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही प्रकारचे मजुरांची मदत न घेता बबन यांनी सगळे व्यवस्थापन सांभाळले आहे.
2- या कोंबड्यांसाठी दर्जेदार खादयाची खरेदी करताना चांगल्या कंपन्यांकडून ते खरेदी करण्याकडे त्यांनी लक्ष दिले आहे. तसेच ते खाद्यासाठी घरच्या शेतीतील जे काही मकाचे उत्पादन होते त्याचा देखील वापर करतात.
3- यामध्ये सोनल जातीच्या कोंबड्यांंकरिता 60 बाय 30 फूट आकाराचे शेड बांधले आहे.
4- तसेच अंडे देणाऱ्या कोंबड्यांसाठी 25 बाय 25 बाय आठ फूट आकाराचा पाण्याचा मोठा टॅंक केलेला आहे व त्यावर लोखंडी जाळीच्या आच्छादन केले असून यामध्ये कटला जातीच्या माशांचे पालन तर त्या जाळीच्या वरच्या भागात कोंबडी पालन असा दुहेरी वापर त्यांनी कौशल्यपूर्ण रीतीने केला आहे. हे कोंबड्यांच्या पहिल्या बॅचपासून प्रति किलो 150 ते 175 रुपये दराने त्यांनी मासे यांची विक्री देखील केलेली आहे व देशी कोंबडी पालन सोबतच मासे पालनातून देखील त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.
कसे केले आहे विक्री व्यवस्थापन?
बबन यांनी जागेवरच या सगळ्या कोंबड्यांची विक्री व्यवस्थापनाचे नियोजन केलेल्या असून व्यापारी व ग्राहक जागेवर येऊन चिकनसाठी कोंबड्या घेऊन जातात. प्रति किलो 250 ते 300 रुपये इतका दर मिळतो व गावरान अंडे असल्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
जे ग्राहक त्यांच्याकडे नियमितपणे किंवा ठोक खरेदी करतात त्यांना किलोला दहा रुपये व इतरांना बारा रुपये प्रति नगाने अंड्यांची विक्री होते. जर आपण त्यांचे नियमित ग्राहक पाहिले तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच त्या ठिकाणी असलेले महावितरण कंपनी आणि इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग बबन यांचा अंडे उत्पादनाचे नियमित ग्राहक आहेत.
तसेच त्यांचे अकोला शहरामध्ये लॉन्ड्री असून त्या ठिकाणी देखील त्या अंडे विक्रीला ठेवतात. अशा रीतीने स्थानिक पातळीवरच त्यांनी विक्री व्यवस्था मजबूत केली असून त्या माध्यमातून चांगला ते नफा मिळवत आहेत.