सध्या मोठ्या प्रमाणावर तरुणाई शेतीकडे वळल्यामुळे आता शेतीचे रूपडे पालटून गेले आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत आताचे तरुणाई विविध फळबागांची लागवड तसेच भाजीपाला पिकांची लागवड व त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन भरघोस उत्पादन मिळवताना आपल्याला दिसून येत आहे.
फळबागांमध्ये डाळिंब, द्राक्ष, पेरू, सिताफळ, आंबा तसेच स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फ्रुट सारखे पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. परंतु इतर पिकांप्रमाणे जर फळबागांपासून देखील भरघोस उत्पादन हवे असेल तर संबंधित फळ पिकाचे दर्जेदार वाणाची लागवडीसाठी निवड करणे खूप गरजेचे असते
व हीच बाब द्राक्ष लागवडीच्या बाबतीत देखील लागू होते. द्राक्ष या फळ पिकाचे देखील अनेक वाण आहेत. त्यामुळे भरघोस उत्पादन देणाऱ्या दर्जेदार अशा वाणाची लागवडीसाठी निवड करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये द्राक्ष शेतीतून अधिक नफा मिळवता यावा व अधिक उत्पादन मिळावे अशा एका द्राक्ष वाणाची माहिती घेणार आहोत.
द्राक्षाचा पुसा नवरंग वाण आहे अधिक उत्पादन देणारा
भारतीय कृषी संशोधन संस्था अर्थात आयसीआरच्या माध्यमातून पुसा नवरंग या द्राक्षाच्या नवीन वाणाची निर्मिती करण्यात आली असून हा वाण भरघोस उत्पादन तर देतोच परंतु काढणीला देखील लवकर येतो. या वाणाची द्राक्ष मध्यम आकाराची असतात. द्राक्षाची ही जात संकरित असून या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बी नसते.
म्हणजे बी विरहित असा हा वाण आहे. तसेच या वाणाच्या द्राक्षाचा रंग हा काळा असतो. याचा बहुतांशी वापर हा द्राक्षाचे ज्यूस आणि वाईन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. दुसरी बाब म्हणजे पुसा नवरंग द्राक्ष वाणाच्या मदतीनेच पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने पुसा नवरंग आणि फ्लेम सिडलेस जातीच्या संकर प्रक्रियेतून मांजरी मेडिका द्राक्षाची नवीन जात विकसित केली असून ती देखील ज्युस निर्मितीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
याशिवाय शेतकरी शरद सिडलेस, माणिक चमन तसेच थॉमसन सीडलेस, रेड ब्लॉग सारख्या जातींची लागवड करून देखील अधिक उत्पादन मिळवू शकतात. तसेच नाशिक येथील प्रसिद्ध असलेले सह्याद्री फार्म्स या शेतकरी उत्पादन संस्थेच्या माध्यमातून आरा नावाचे द्राक्ष वाण विकसित करण्यात आलेले आहे.
या वाणापासून देखील दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. विशेष म्हणजे सह्याद्री फार्मच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या आरा या वाणाला इतर वाणांपेक्षा निर्याती करिता जास्त मागणी असल्यामुळे त्याला जास्तीचा दर मिळतो.