Rabi Pik Vima : नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकऱ्यांचे कायमच मोठे नुकसान होते. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान होते परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसतो.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पिकांना विम्याचे संरक्षण देणे हेतू केंद्र शासनाच्या माध्यमातून 2016 पासून पिक विमा योजना राबवली जात आहे. पीएम फसल बीमा योजना असे या योजनेचे नाव असून खरीप आणि रब्बी हंगामासाठी या योजनेअंतर्गत पिकांचे विमा उतरवला जाऊ शकतो. दरम्यान आता रब्बी हंगामातील पिकांचा पिक विमा काढण्यासाठी शेतकरी बांधवांना शासनाकडून आवाहन केले जात आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पीक विमा योजनेअंतर्गत देशातील कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे सर्व शेतकरी पिकाचा विमा काढू शकणार आहेत. यामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे ज्या पिकाचा विमा उतरवला त्या पिकाचे नुकसान झाल्यास मोबदल्यात नुकसान भरपाई मिळणार आहे.
राज्य शासनाने निर्धारित केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई मिळणार आहे. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदवले गेल्यास नुकसान भरपाई मिळते. हवामानातील बदलांमुळे पिकांचं होणारं नुकसान, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान; या बाबींचा यामध्ये समावेश पिक विमा योजनेत करण्यात आलेला आहे.
शेतकरी बांधवांना पिकाचा विमा काढण्यासाठी संबंधित पिकाचा विमा हप्ता किंवा प्रीमियम भरावा लागतो. विमा संरक्षित रक्कमेच्या १.५ टक्के हप्ता किंवा प्रीमियम शेतकऱ्यांना भरावयाचा असतो. मात्र नगदी व व्यापारी पिकांसाठी ५ टक्के हप्ता भरावयाचा असतो. उर्वरित संरक्षण रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून संबंधित पिक विमा कंपन्याला वर्ग केली जाते. म्हणजेच शेतकऱ्याचा केंद्राचा तसेच राज्याचा संरक्षित विमा रकमेत वाटा असतो.
दरम्यान, रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा भरणे हेतू 30 नोव्हेंबर ही अंतिम दिनांक आहे. मात्र गहू, हरभरा, कांदा यासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. यासह उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत अंतिम मुदत आहे.
यामुळे अधिकाधिक शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील पिक विमा काढण्यासाठी शासनाकडून आवाहन केले जात आहे. खरं पाहता खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव पिक विमा उतरवत असतात. मात्र रब्बी हंगामात नुकसानीची शक्यता कमी असते, यामुळे शेतकऱ्यांकडून कायमच रब्बी हंगामात कमी प्रमाणात पीक विमा उतरवला जातो.