कृषी

Farmer Success Story: मालेगाव तालुक्यातील शिंदे बंधूंनी दुष्काळावर मात करत फुलवली डाळिंबाची बाग! मिळेल लाखात उत्पन्न

Farmer Success Story:- शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय. पाऊस चांगला झाला तर शेतीमध्ये पीक चांगले येते. परंतु जर दुष्काळाची परिस्थिती उद्भवली तर मात्र शेतीमध्ये कष्ट करून बहरलेले पीक डोळ्यादेखत करपून जाते.

तसेच दुसरी बाब म्हणजे दुष्काळा व्यतिरिक्त बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी घास येतो आणि गारपीट तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे पिके जमीन दोस्त होतात व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

या सगळ्या चक्रामुळे शेतकरी हतबल  झाल्याची सध्या स्थिती आहे. त्यातल्या त्यात जर एखादा दुष्काळी भाग असेल किंवा एखाद्या भागामध्ये कायमच कमी पाऊस होत असेल तर मात्र अशा ठिकाणी शेती करताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा भागातील  शेतकरी विविध प्रकारच्या सिंचन सुविधा, शेततळ्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतात व शेती फुलवतात. त्यातही हातात पीक आले परंतु शेतीमालाला योग्य भाव मिळेल याची कुठलीही शाश्वती नसते.

अशा प्रकारचे साधारणपणे एकंदरीत सध्या शेतीचे गणित आपल्याला पाहायला मिळते. तरीदेखील अशा परिस्थितीशी दोन हात करत शेतकरी परिस्थितीशी झगडत असतात व पिकाचे नवनवीन प्रयोग करून हातात आर्थिक उत्पन्न मिळेल या अपेक्षेने काबाडकष्ट करतात.

बरेच शेतकरी कमीत कमी पावसात देखील अनेक प्रकारचे पर्याय वापरून फळबाग देखील फुलवतात. याकरिता उपलब्ध होईल तितक्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून आणि योग्य व्यवस्थापन ठेवून दर्जेदार असे फळांचे उत्पादन देखील घेताना आपल्याला दिसून येतात.

याच पद्धतीने जर आपण मालेगाव तालुक्यातील माळमाथा हा परिसर पाहिला तर या ठिकाणी कायमच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. परंतु तरी देखील या भागातील बरेच शेतकऱ्यांनी  वेगवेगळ्या मार्गांनी पाण्याची सोय करून फळबागा फुलवलेले आहेत.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे मालेगाव तालुक्यातील जळकू या गावचे नितीन व अमोल शिंदे हे बंधू होत. या दोघेही भावांनी काबाड कष्ट करून पाणीटंचाईच्या कालावधीमध्ये देखील दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेण्यामध्ये यश मिळवलेले आहे.

 शिंदे बंधूंनी दुष्काळावर मात करून फुलवली डाळिंबाची बाग

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मालेगाव तालुक्यातील कायमच मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असलेला माळमाथा परिसरातील झोडगे, चिखलओहोळ आणि जळकू या गावातील शेतकऱ्यांनी  दुष्काळावर मात करत वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा फुलवलेले आहेत.

यामध्ये जळकू येथील नितीन शिंदे व अमोल शिंदे या दोन भावांनी यावर्षी पाणीटंचाई असलेल्या कालावधीत देखील दर्जेदार अशी डाळिंबाचे उत्पादन घेण्याची किमया साध्य केलेली आहे. नितीन आणि अमोल शिंदे व परिवार हे शेतीसोबतच बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आणि वीट भट्टी उद्योगात देखील कार्यरत असून यामध्ये देखील त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

शेतामध्ये शेततळ्यातील पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून डाळिंबाला पुरवून त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली असून त्यांच्या शेतामध्ये सध्या सोलापूर लाल जातीचा डाळिंब बहरलेला आहे. या ठिकाणी सध्या विविध राज्यातील व्यापारी थेट शेताच्या बांधावर डाळिंब खरेदीसाठी येताना दिसून येतात.

याच प्रकारे जर आपण इतर शेतकऱ्यांचा व माळमाथा परिसराचा विचार केला तर या ठिकाणी सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे जितके पाणी उपलब्ध होते तितक्या पाण्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इथले शेतकरी विविध प्रयोग शेतीमध्ये करतात व जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात.

डाळिंबासोबतच शिंदे बंधूंनी मागच्या काही कालावधीमध्ये माळमाथासारख्या अवर्षण ग्रस्त असलेल्या परिसरामध्ये निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेण्याची किमया साधली होती. या वर्षी देखील त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून दुष्काळाच्या कालावधीत देखील दर्जेदार अशा डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.

यावरून आपल्याला दिसून येते की उपलब्ध पाण्याचा वापर कौशल्यपूर्ण रीतीने करून व नवनवीन प्रयोग शेतीत करून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts