कृषी

Goat Rearing: शेळीची ‘ही’ जात एका वेतात देते चार पिल्ले! पाळाल या जातीच्या शेळ्या तर वर्षात होईल 3 लाखांची कमाई

Goat Rearing:- शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असून गुंतवणुकीच्या मानाने या व्यवसायातून जास्त नफा मिळतो. त्यामुळे आता अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक शेळीपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळू लागले आहेत.

तसेच इतर जोडधंद्याप्रमाणे शेळीपालन व्यवसायात देखील तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचा होताना दिसत आहे. शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी ज्या प्रमाणात व्यवस्थापनाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे शेळीपालनासाठी जातिवंत अशा शेळ्यांच्या जातींची निवड हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

भारतामध्ये अनेक शेळ्यांच्या जाती आहेत व त्यातील काही जाती या शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या व फायदेशीर आहेत. त्यातीलच एका शेळीच्या जातीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत जी  शेळीपालनासाठी अतिशय उत्तम अशी जात ठरू शकते.

 सोनपरी शेळी शेळीपालनासाठी ठरेल उत्तम

भारतामध्ये ज्या काही शेळीच्या जाती आहेत त्यामध्ये सोनपरी ही जात विशेष प्रसिद्ध आहे. जर आपण शेळीपालन व्यवसायातील तज्ञांचे मत पाहिले तर त्यानुसार सोनपरी जातीची शेळी ही प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळली जाते. तसेच सोनपुरी जातीच्या शेळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही बेरारी आणि ब्लॅक बंगाल या दोन जातींच्या संकरातून विकसित करण्यात आलेली जात आहे.

 सोनपरी जातीच्या शेळीचे शारीरिक रचना

या जातीच्या शेळीचा रंग हा प्रामुख्याने तपकिरी असतो व पाठीवर डोक्यापासून तर शेपटीपर्यंत काळी रेष असते व या रेषेवरूनच ही शेळी ओळखली जाते. तसेच सोनपरी जातीच्या शेळीची शिंगे मागच्या बाजूला वाकलेली असतात. बंदिस्त शेळीपालनासाठी शेळीची ही जात खूप फायदेशीर आहे.

 एका वेतात देते चार पिल्लांना जन्म

सोनपरी जातीच्या शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका वेतांमध्ये चार पिल्लांना जन्म देण्यास सक्षम आहे. तसेच या जातीच्या शेळीचे मांस चवीला उत्कृष्ट असल्यामुळे त्याला बाजारात खूप मागणी असते.

त्यामुळे सोनपरी जातीच्या शेळीचे पालन हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. साधारणपणे सोनपरी जातीच्या दहा शेळ्यांचे पालन केले तरी एका वर्षामध्ये अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हमखास मिळणे शक्य आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil