Agricultural News : ऐन सोयाबीनच्या फुलार अवस्थेत असून बाही तयार होण्याकरिता पावसाची नितांत गरज असताना संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाविना कोरडा गेल्याने पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, सुसरे, साकेगाव, पाडळी, चितळी, ढवळेवाडी परीसरात सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. परिणामी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंतातुर झाला आहे.
मृग नक्षत्रात यावर्षी वेळेवर पाऊस न पडल्याने सोयाबीनची पेरणी जून ऐवजी जुलै महिन्यात झाली. पेरणीनंतर जुलै महिन्यातल्या पुष्प नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने सोयाबीन पीकाची अवस्था मागील चार ते पाच वर्षापेक्षा चांगल्या स्थितीत आहे.
एकरी ९ ते १० पोते पिकेल अशी शेतकऱ्याची आशा आहे. परंतु, आता फुलोरा अवस्थेत असलेल्या सोयाबीनची बाही तयार होऊन शेंगा तयार होण्यासाठी सोयाबीन पिकाला दमदार पावसाची गरज आहे.
ऑगस्ट महिन्यातील आश्लेषा, मेघा, फाल्गुनी संपूर्ण नक्षत्र कोरडे गेल्याने सोयाबिन पीक धोक्यात आले असून, येणारे पीक हातून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कमी खर्चाच जास्त उत्पादन देणारे सोयाबीनचे पीक आहे.
विशेष म्हणजे यावर्षी पाऊस लांबल्यामुळे कपाशी ऐवजी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पसंती दिल्यामुळे सोयाबीनची लागवड झाली आहे. सोयाबीन शेवटच्या टप्यात असून आता शेंगा तयार होण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.
काही हवामान तज्ञ ७ ते ८ सप्टेंबरला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवत आहे. भर पावसाच्या दिवसात उन्हाळ्यासारखे ऊन तापत असल्याने सोयाबीनला फटका बसत आहे.