Soybean Crop :- राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर हा कालावधी सोयाबीन पीक वाढीसाठी महत्त्वाचा असून याच कालावधीमध्ये बऱ्याचदा सोयाबीनचे पीक पिवळे पडल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. अशाप्रकारे सोयाबीन पिवळे पडण्याने उत्पादनामध्ये घट येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यामागील कारणे ओळखून योग्य त्या उपाययोजना तात्काळ करणे खूप गरजेचे असते. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये सोयाबीनची पाने पिवळी का पडतात व त्यावरील प्रमुख उपाय योजना कोणत्या? इत्यादीबद्दल माहिती घेणार आहोत.
सोयाबीनची पाने पिवळी पडण्यामागील प्रमुख कारणे
1- बऱ्याचदा जर अपुरा पाऊस पडला तर जमिनीतील ओलावा कमी होतो. अशाप्रकारे ओलावा कमी झाल्यामुळे सोयाबीनच्या पीक वाढीकरता जे काही आवश्यक असणारे पाणी व अन्नद्रव्य लागते त्याची कमतरता भासते व सोयाबीन पीक पिवळे पडायला सुरुवात होते.
2- ज्याप्रकारे कमी पावसामुळे ही परिस्थिती उद्भवते अगदी त्याच पद्धतीने पाऊस जास्त झाला तरी अधिक ओलावा राहिल्यामुळे जमीन जलसंपृक्त बनते. अशा जमिनीमध्ये हवा व्यवस्थित खेळती राहत नसल्यामुळे मुळाना श्वासोश्वास करण्याला अडचणी निर्माण होतात व त्यामुळे आवश्यक पोषक द्रव्य व्यवस्थित शोषून घेता येत नाही व शेंड्याकडील पाने पिवळी पडायला लागतात.
3- तसेच जमिनीचा सामु जर जास्त प्रमाणात आम्लधर्मी असेल तर अशा शेतामध्ये जर ओलावा असला तरी देखील पाने पिवळी पडतात.
4- तसेच पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्य जसे की नत्र, लोह व पालाश यांचे कमतरता असली तरी पाने पिवळी पडायला लागतात.
5- तसेच या दिवसांमध्ये जर सतत ढगाळ वातावरण राहिले तर पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही व प्रकाश संश्लेषण क्रिया मंदगतीने होते. त्यामुळे देखील पाने पिवळी पडतात.
6- तसेच विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील सोयाबीनचे पाने पिवळी पडतात.
रोगांचा प्रादुर्भाव
सोयाबीन पिकावर जर पिवळा मोसेक हा रोग आला तरी पाने पिवळी पडायला लागतात. यासोबतच मर किंवा मुळकुज या रोगांचा प्रादुर्भाव झाला तरीसुद्धा पीक पिवळे पडण्याचे दिसून येते. खोडमाशीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी साधारणपणे दिसायला लागतो. त्यामुळे झाडाच्या शेंड्याकडील तीन पाने अगोदर पिवळी पडतात व झाड सुखायला लागते.
या उपाययोजना कराव्यात
1- सोयाबीनच्या पेरणी करता साधारणपणे मध्यम स्वरूपाची तसेच भुसभुशीत व पाण्याचा योग्य निचरा होणारी जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण उत्तम असेल अशी जमीन निवडावी. सोयाबीन पेरणी करिता चोपण तसेच क्षारपड,हलक्या जमिनीचा वापर करू नये.
2- सोयाबीनची पेरणी करण्याअगोदर बियाण्याला रायझोबियम, पीएसबी व ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करून घ्यावी.
3- पाऊस कमी पडत असेल किंवा पाऊस पडून गेल्यानंतर मोठा खंड पडला असेल तर पिकास पाणी देण्याची व्यवस्था करावी.
4- तसेच जास्त पाऊस झाला असेल व शेतामध्ये पाणी साचले असेल तर पाण्याचा निचरा करण्याकरिता जमिनीच्या उताराच्या दिशेने चर काढावेत व शेतावर पाणी काढण्याचा प्रयत्न करावा. अशा परिस्थितीमध्ये जर कॉपर ऑक्सिक्लोराईड हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्याची आळवणी किंवा पिकावर फवारणी करावी.
5- जमिनीमध्ये जर नत्र कमी असेल तर याकरिता युरिया 02 टक्के म्हणजेच प्रति लिटर वीस ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.
6- तसेच चुनखडीयुक्त शेत असेल तर सोयाबीनच्या पिकास फेरस सल्फेट पाच ग्रॅम अधिक २.५ ग्राम कळीचा चुना प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी दोन वेळा करावी.
7- पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर प्रादुर्भावित झाडे उपटून काढून नष्ट करावी. तसेच शेतामध्ये पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता पिवळे चिकट सापळे लावावेत यासोबत निंबोळी अर्काची किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक तीन ते पाच मिली प्रतिलिटर याप्रमाणे दहा दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर तीस दिवसांनी पहिली व पहिलीच्या दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.
फवारणी करण्याअगोदर कृषी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.