Soybean Crop:- महाराष्ट्रामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील हे प्रमुख पीक असून बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सोयाबीन पिकावर अवलंबून असते. या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातील सध्या पावसाचा विचार केला तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे साहजिकच शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे किंवा पुराचे पाणी देखील शेतांमध्ये जाण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकात पाणी साचून राहिल्यामुळे अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साचलेले पाणी शेता बाहेर काढणे महत्त्वाचे असून त्याचा उत्तम पद्धतीने निचरा होणे गरजेचे आहे.
सततच्या पावसामध्ये सोयाबीन पिकाची अशा पद्धतीने घ्या काळजी
1- सध्या बऱ्याच ठिकाणी सतत पाऊस सुरू असून ढगाळ वातावरण आहे. अशावेळी जर चुनखडीयुक्त जमिनीत सोयाबीनची लागवड केलेली असेल तर अशा ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची शक्यता असते. कारण ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही व प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.
एवढेच नाही तर जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिकांना मुळांच्या माध्यमातून होत असलेली अन्नद्रव्य घेण्याची क्रिया देखील मंद होते. त्यामुळे सर्वप्रथम शेतात साचून राहिलेले पाणी लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच पाण्याचा निचरा करावा.
2- तसेच पाणी उघडल्यानंतर वाफसा परिस्थिती आल्यावर कोळपणी करून घेणे गरजेचे असून त्यामुळे पिकाची वाढ चांगली होईल. तसेच या शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोनची 50 मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून एक फवारणी करून घ्यावी. जर एकदा फवारणी करून पिवळी झालेली पाने हिरवी झाली नाही तर परत आठ दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.
3- या परिस्थितीमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतामध्ये जर शंखी गोगलगायी दिसत असतील तर त्या गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून त्या नष्ट कराव्यात. गोगलगायींच्या प्रभावी नियंत्रणासाठी दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगाय नाशक दोन किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये बांधाच्या कडेला आणि बांधांवर संध्याकाळच्या वेळी पसरून द्यावे.
4- शेतामध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचे चार किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करून घ्यावी.
5- तसेच सोयाबीन पिकावर जर या कालावधीमध्ये खोडमाशी किंवा ऊंटअळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर प्रोफेनफॉस( 50%) 20 मिली किंवा मिश्र कीटकनाशक लॅबडा सायहॅलोथ्रीन(9.5 टक्के) अधिक थायमेथॉक्स्झाम (12.6%) 50 मिली प्रति एकर प्रमाणे फवारणी करून घ्यावी.तसेच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.