Soybeans Farming Tips: सोयाबीनची लागवड महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील हे प्रमुख तेलबिया वर्गातील पीक असून शेतकऱ्यांचे बरेचसे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते. परंतु गेल्या काही वर्षाचा विचार केला तर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यासोबतच सोयाबीनवर गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
मागच्या वर्षी देखील महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोगलगायींचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाल्याने खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गोगलगाईंचा वेळीच प्रतिबंध करणे खूप गरजेचे आहे. गोगलगायींचा प्रतिबंध प्रभावीपणे करता यावा याकरिता असणाऱ्या महत्त्वाच्या उपाययोजना राबवण्याचे आवाहन देखील कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गोगलगाईच्या प्रतिबंधाबाबत कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गोगलगायींचा प्रादुर्भाव व प्रतिबंध याबाबत जनजागृती व्हावी याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून खामगाव येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले होते. या चर्चासत्रामध्ये तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी म्हटले की, गोगल गाईच्या प्रभावी नियंत्रणाकरिता ज्या शेतामध्ये सोयाबीन लागवड केलेली आहे त्या शेताचे बांधांची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे.
तसेच शेताच्या बांधाच्या कडेने चुना अथवा राखेचा दहा सेंटिमीटरचा पट्टा व्यवस्थित टाकून घ्यावा किंवा पसरवून घ्यावा. तसेच महत्त्वाचे म्हणजे रात्रीची वेळ असेल तेव्हा गवताचे ढीग व गुळाच्या पाण्यामध्ये भिजवलेले गोणपाट यांचा वापर करावा. या माध्यमातून गवताच्या ढिगा खाली व गोणपाटाखाली गोगलगायी जमा होतात. या जमा झालेल्या गोगलगाई 10% मिठाच्या द्रावणाच्या वापरातून नियंत्रणात आणाव्यात.
तसेच पुढे त्यांनी म्हटले की, अशा पद्धतीने गोगलगायी गोळा करताना हातमोजांचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्याकरिता देखील त्यांनी मार्गदर्शन केले व या पद्धतीने जर नियंत्रण करायचे असेल तर मेटाल्डीहाईड या दाणेदार कीडनाशकाचा वापर कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार करणे गरजेचे आहे.
सोयाबीन पिका व्यतिरिक्त फळबागांमध्ये देखील गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येतो. याकरिता फळबागाच्या झाडाच्या खोडाला जर दहा टक्के बोर्डो पेस्ट लावली तर गोगलगायीला झाडावर चढता येत नाही अशा पद्धतीने तिचे नियंत्रण करता येणे शक्य होते.