Strawberry Farming:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या फळबागांची लागवड व इतर भाजीपाला पिके लागवडीच्या माध्यमातून शेतकरी आता अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखात उत्पन्न घेऊ लागले आहेत.
साधारणपणे जर आपण सध्याच्या शेतीचे स्वरूप पाहिले तर ते गहू, ज्वारी, बाजरी तसेच मका व कपाशी सारख्या पिकांकडून आता विविध प्रकारचा भाजीपाला, वेगवेगळे फळबागा लागवड याकडे मोठ्या प्रमाणावर वळली आहे. तसेच योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले व्यवस्थापनामुळे जे एक ते दोन एकर क्षेत्रामध्ये उत्पन्न येऊ शकते ते अगदी काही गुंठ्यांमध्ये शेतकरी मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत.
यामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीच्या संबंधित पाहिले तर स्ट्रॉबेरीची लागवड देखील आता मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होत असून अगोदर महाबळेश्वर या परिसरामध्ये स्ट्रॉबेरी पाहायला मिळायची. परंतु आता महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी चा प्रयोग यशस्वी केला आहे.
या स्ट्रॉबेरी पिकाच्या अनुषंगाने आपण तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथील अमोल आणि सचिन लोमटे या भावांचा विचार केला तर त्यांनी अवघ्या बारा गुंठे जमिनीवर पाच हजार स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करून लाखात उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.
लोमटे बंधूंचा स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथील अमोल व सचिन लोमटे या भावांकडे आठ एकर शेती असून त्यामध्ये ते सोयाबीन तसेच तुरीसारखे परंपरागत पिके घेतात. परंतु काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने त्यांनी 12 गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचे ठरवले.
याकरिता त्यांनी पाचगणी येथून पाच हजार स्ट्रॉबेरीची रोपे आणली व त्यांची लागवड केली. या पिकाकरता त्यांनी फक्त शेणखताचा वापर केला व इतर जैविक खते देखील वापरली. स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय मागे जर आपण लोमटे बंधूंचा विचार केला तर दोघे भावांपैकी सचिन लोमटे हे पुण्याला एका कंपनीत नोकरीला होते.
परंतु कोरोना कालावधीमध्ये ते घरी आले व भावासोबत शेतीमध्ये त्यांना मदत करू लागले. परंतु काहीतरी नवीन करावे या इच्छेतून त्यांनी खरबूज लागवड केली व पहिल्याच वर्षी चांगले उत्पन्न देखील मिळवले.परंतु दुसऱ्या वर्षी खरबूजाने मात्र त्यांना आर्थिक फटका दिला.
त्यामुळे खरबूज लागवडीला राम राम ठोकत त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला व बारा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली. या बारा गुंठ्यासाठी त्यांनी पाच हजार रोपे पाचगणी येथून खरेदी केली व त्यासाठी त्यांना साठ हजार रुपये इतका खर्च आला व ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांनी याची लागवड केली.
लागवड केल्यानंतर मात्र दीडच महिन्यात स्ट्रॉबेरीला फळधारणा व्हायला सुरुवात झाली व आतापर्यंत स्ट्रॉबेरीचे त्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले व अजून दोन लाख रुपये उत्पन्न याच 12 गुंठ्यातून मिळेल ही अपेक्षा त्यांना आहे.
म्हणजेच सहाच महिन्यात साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. यापद्धतीने लोमटे बंधूंनी विपरीत अशा हवामान परिस्थितीत देखील स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवल्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.
अशा पद्धतीने जर नाविन्याचा ध्यास घेऊन शेतीमध्ये काही वेगळा प्रयोग करून पाहिला व त्याला व्यवस्थापन व तंत्रज्ञानाची उत्तम जोड दिली तर कमीत कमी क्षेत्रात चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते हे लोमटे बंधूंच्या उदाहरणाने सिद्ध होते.