Subsidy For Nursery:- शेती संबंधित उद्योग व्यवसायांचा विचार केला तर अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग, वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे व इतर अनेक व्यवसायांची यादी आपल्याला सांगता येईल. विविध प्रकारचे नैसर्गिक आपत्ती आणि बाजारपेठेत सातत्याने घसरलेले बाजारभावांच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांनी शेतीसोबत काहीतरी दुसरा व्यवसाय उभारणी करणे खूप गरजेचे आहे.
त्यासोबतच नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी कुटुंबातील आणि इतर तरुणांनी शेतीशी संबंधित व्यवसायांमध्ये पुढे येणे गरजेचे आहे व याकरिताच शासनाच्या अनेक योजना देखील खूप महत्वपूर्ण ठरताना दिसून येत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळबाग लागवड होत असल्यामुळे अशा पिकांच्या रोपांच्या पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून नर्सरी म्हणजेच रोपवाटिका व्यवसाय येणाऱ्या कालावधीत तरुणांसाठी खूप महत्त्वाचा व्यवसाय ठरणार असून या माध्यमातून शेतकरी लाखोंची उलाढाल करू शकतील
असा हा व्यवसाय आहे. म्हणूनच राज्य सरकारच्या मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून रोपवाटिका अर्थात नर्सरी उद्योगाकरिता अनुदान प्राप्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासंबंधीचीच माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
किती लाभार्थी निवडले जाणार?
मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून समाविष्ट असणारे पेरू, सिताफळ, संत्रा, डाळिंब, चिकू, आंबा, काजू, मोसंबी, हिरवी आणि लाल मिरची, पडवळ व फुलपिके यासारख्या फलोत्पादन पिकांकरिता नर्सरी उभारणी तसेच केळी, स्ट्रॉबेरी, पेरू, डाळिंब आणि इतर फुल पिके या निवडक फलोत्पादन पिकांकरिता उती संवर्धन युनिट उभारण्यासाठी
लाभार्थ्यांकडून पात्र अर्जांचे मूल्यांकन करून जे काही मूल्यांकनाचे निकष आहेत त्यानुसार रोपवाटिका उभारण्यासाठी प्रथम सात व उती संवर्धन युनिट करिता प्रथम दोन लाभार्थ्यांची निवड मॅग्नेट प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत ज्या लाभार्थींची निवड होईल त्यांना अनुदानाच्या स्वरूपात रोपवाटिका उभारण्याकरिता जो काही पात्र प्रकल्प आहे त्या प्रकल्प किमतीच्या कमाल 60% किंवा कमाल साठ लाख रुपये प्रति प्रकल्प पैकी जे कमी असेल इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
या तारखेपर्यंत करा अर्ज
ज्या इच्छुक पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल ते 11 जानेवारी 2024 सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
अधिकच्या माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
यासाठी आवश्यक लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच पात्रता निकष तसेच पात्र व अपात्र घटक, या प्रकल्पांतर्गत मिळणारे अर्थसाह्याचे स्वरूप तसेच लाभार्थी निहाय विहित नमुन्यातील अर्ज, अर्ज मूल्यांकनाचे निकष, कागदपत्रांची तपासणी सूची इत्यादी बद्दल महत्वाची माहिती तुम्हाला महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क अर्थात मॅग्नेट प्रकल्प पुणे यांच्या www.magnetadb.com या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या www.msamb.com या संकेतस्थळावर मिळेल.