Successful Farmer : भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. विशेष म्हणजे बहुसंख्य शेतकऱ्यांकडे खूपच कमी शेत जमीन आहे. यामुळे शेतकरी बांधव कमी शेतजमिनीच रडगाणं पुढे करत कमी जमिनीत कसं बरं चांगल उत्पादन मिळेल अशी तक्रार करत असतात.
मात्र जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याच्या मौजे गोद्री येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतजमिनीतुन केळी लागवड करत तब्बल सव्वा दहा लाखांची कमाई करून दाखवली आहे. समाधान पाटील असं या प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाव. यामुळे सध्या पाटील यांची गोद्री व परिसरात चांगलीचं चर्चा रंगली आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या दोन एकर शेतजमीनीत जानेवारीमध्ये केळीची लागवड केली. यासाठी तीन हजार रोपांची त्यांना गरज भासली. केळीच्या रोपांसाठी त्यांना 45 हजार रुपयांचा खर्च आला. तसेच केळीची बाग जोपासण्यासाठी साधारणपणे 55 हजार रुपये खर्च आला.
म्हणजेच दोन एकरात केळी लागवड करण्यापासून ते काढणीपर्यंत त्यांना जवळपास एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. 11 महिन्यात हे केळीचे पिक काढण्यासाठी तयार झाले. त्यांनी उत्पादित केलेल्या केळीला 2250 रुपये असा सरासरी भाव मिळाला. केळी लागवड केल्यानंतर पिकासाठी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासली.
यावर मात करण्यासाठी त्यांनी गोद्री प्रकल्पातून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी केळी पिकाला पुरवले. समाधान पाटील यांना या कामी त्यांचे चिरंजीव भूषण पाटील यांनी मदत केली. भूषण हे खरं पाहता पदवीधर आहेत मात्र असे असले तरी त्यांनी नोकरी ऐवजी कमी शेत जमीन असताना देखील शेतीच करण्याचा निर्णय घेतला आहे.
निश्चितच एकीकडे शेतकरी बांधव कमी शेतजमीन, निसर्गाचा लहरीपणा शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल तर यांसारख्या एक ना अनेक अडचणी वाचून दाखवतात. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील जर योग्य नियोजन आखलं तर कमी शेतजमिनीतूनही लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे या बापलेकाच्या जोडीने दाखवून दिल आहे.
पाटील यांच्या मते शेतीमध्ये शेतकरी बांधवांनी अनावश्यक खर्च टाळायला पाहिजे. अनावश्यक खर्च जर टाळला तर उत्पन्नात भरीव वाढ होते. असा अनुभव त्यांना स्वतः आला असल्याने ते नियोजनपूर्वक शेती करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला देतात.