कृषी

Sugarcane Crop: ‘या’ शेतकऱ्याने मिळवला एकरी 100 टन उसाचा उतारा! वाचा या शेतकऱ्याचे शास्त्रशुद्ध नियोजन

Sugarcane Crop:- कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी सगळ्या पद्धतीचे व्यवस्थापन हे अगदी काटेकोरपणे करावे लागते. पिकाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी या वेळच्यावेळी करणे देखील तितकेच गरजेचे असते.त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील पिकांपासून चांगले उत्पादन मिळते.

पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन तसेच लागवडीचे नियोजन व लागवडीचा योग्य कालावधी या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वेळेत पूर्ण केल्या व शिफारसी प्रमाणे केल्या तर नक्कीच चांगले उत्पादन हाती येते.

अगदी याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या मोरोची गाव येथील लक्ष्मण सूळ यांनी व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थापनाने एका एकर मध्ये 100 टन उसाचे उत्पादन मिळवले आहे. या शेतकऱ्याने उसाचे नियोजन कशा पद्धतीने केले याची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 लक्ष्मण सूळ यांनी एका एकरमध्ये घेतले 100 टन उसाचे उत्पादन

मोरोची गाव या ठिकाणचे शेतकरी लक्ष्मण सूळ यांची 31 एकर शेती आहे व ते या क्षेत्रामध्ये डाळिंब तसेच केळी या प्रकारचे पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. सध्या त्यांनी पाच एकर मध्ये सिताफळ तसेच दीड एकर क्षेत्रामध्ये केळी, सीताफळामध्ये पपई आणि डाळिंबात शेवग्याच्या आंतरपीक म्हणून अंतर्भाव केलेला आहे.

परंतु या व्यतिरिक्त ऊस हे त्यांचे मुख्य पीक असून 13 ते 14 एकर क्षेत्रावर त्यांचे ऊस पीक आहे. प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश कबाडे यांच्याकडून मार्गदर्शन व त्यांनी ऊस शेतीत केलेल्या प्रयोगांचा अवलंब करत त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने उसाची शेती केली व 100 टन एका एकर मध्ये उसाचे उत्पादन मिळवले.

 त्यांच्या नियोजनाच्या ठळक बाबी

1- उसाच्या रोपांची निर्मिती उसाचे  गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार उत्पादन यावे याकरिता ते  ऊसाच्या कांड्याऐवजी रोपांची लागवड करतात. रोप निर्मिती करिता एक गुंठे क्षेत्र निवडण्यात आले असून यामध्ये रासायनिक खते तसेच शेणखत व ह्युमिक ऍसिड यांचा वापर करून जमीन तयार केले जाते व सुमारे 30 दिवसात रोप लागवडीसाठी या माध्यमातून तयार होते.

2- पूर्व मशागत खोडवा ऊस तुटल्यानंतर पाचटची कुट्टी करून त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट आणि यूरियाचा वापर केला जातो व दोन वेळा रोटावेटर मारले जाते. यानंतर तागाची पेरणी केली जाते व हा ताग 50 दिवसांनी जागेवरच जमिनीत गाडला जातो. त्यानंतर दोन आठवड्यापर्यंत जमीन तापत ठेवली जाते.

उसाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने नियोजन केले जाते व त्या पद्धतीने रोपांची एकरी संख्या देखील निश्चित केली जाते. लागवडीचे अंतर हे पाच बाय दोन किंवा साडेपाच बाय दीड फूट असे ठेवले जाते. लागवडीसाठी उसाचा को 86032 हा वाण लागवडीसाठी वापरला जातो व आडसाली उसाची लागवड केली जाते. लागवड करण्यापूर्वी ते मोठी भरणी इथपर्यंत बेसल डोस म्हणून एका एकर करता 200 किलो नत्र, शंभर किलो स्फुरद व 120 किलो पालाश हा डोस चार वेळा विभागून दिला जातो.

3- खताचे व्यवस्थापन लागवडी पूर्वी सेंद्रिय खत 200 किलो व लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी दुसरी मात्रा व सोबत सेंद्रिय खत 100 किलो, तिसरी मात्रा साठ ते सत्तर दिवसांनी व त्यासोबत 100 किलो सेंद्रिय खत व जेव्हा उसाची मोठी भरणी केली जाते तेव्हा चौथी मात्रा दिली जाते व सोबत 200 किलो सेंद्रिय खत दिले जाते. तसेच लागवड होऊन आठ ते नऊ  महिने झाल्यानंतर ठिबकच्या माध्यमातून एकरी बारा किलो अमोनियम सल्फेट, सहा किलो पोटॅश, तीन किलो पोटॅशियम सल्फेट या पद्धतीचे मात्रा ऊस काढणीच्या एक महिन्यापर्यंत दिली जाते.

 त्यांचे उसाचे अर्थकारण कसे आहे?

उसाच्या उत्पादनाविषयी व अर्थकारणाविषयी सांगताना सुळे म्हणतात की, एका एकर मध्ये उसाची संख्या 40 ते 45 हजारांच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न असतो व प्रत्येक उसाचे वजन दोन ते तीन किलो पर्यंत मिळाले तरच एकरी शंभर टन किंवा त्यापुढे उत्पादन मिळते. आतापर्यंत त्यांनी 80 ते 90 टना पर्यंत उत्पादन साध्य केले आहे व मागील वर्षी 100 टन ऊस उत्पादनाचा पल्ला गाठला आहे. त्यांचा ऊस उत्पादनाचा एकरी खर्च कमीत कमी एक लाख रुपयांपर्यंत आहे.

ते माळेगाव साखर कारखान्याला ऊस देतात व प्रतिटन 3100 रुपये दर सध्या दिला जात आहे. खोडव्याचे  एकरी 50 ते 60 टन उत्पादन त्यांना मिळत आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी ऊस शेतीमध्ये शास्त्रीय पद्धतींचा वापर केला व जमिनीच्या सुपीकतेकडे विशेष भर दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जमिनीतील मातीचा सेंद्रिय कर्ब हा 0.75 ते एक टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ते दरवर्षी माती परीक्षण करतात व त्यानुसारच मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य खतांच्या वापराचे नियोजन करतात.

अशा पद्धतीने लक्ष्मण सूळ यांनी ऊस शेतीचे नियोजन केले असून त्यातून एकरी शंभर टनाचा पल्ला गाठला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts