कृषी

Sugarcane Farming: खडकाळ माळरानाच्या जमिनीवर 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन! कसे केले या शेतकऱ्याने शक्य?

Sugarcane Farming:- तुम्ही किती क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे यापेक्षा तुम्ही ज्या क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे त्या पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे व यामध्ये तंत्रज्ञानाचा वापराला किती प्राधान्य दिले आहे? या गोष्टींवर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.

आपण असे अनेक शेतकरी पाहतो की अगदी काही गुंठा क्षेत्रामध्ये पिकाची लागवड करतात परंतु दोन किंवा चार एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ते उत्पादनाच्या बाबतीत भारी पडतात. नक्कीच यामागे त्या शेतकऱ्यांचे व्यवस्थापनाचे कौशल्य तर असतेच परंतु कष्ट व मेहनत देखील तितकेच असते.

आता उसाच्या बाबतीत जर पाहिले तर बरेच शेतकरी एकरी 55 ते 80 टन उसाचे उत्पादन घेतात. परंतु काही शेतकरी 15 ते 20 गुंठ्यात देखील 50 टन उस उत्पादना पर्यंत मजल मारताना आपल्याला दिसून येत आहेत. याच पद्धतीने आपण जर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लाटवडे या गावचे शरद पाटील या शेतकऱ्याचा विचार केला तर

त्यांनी परफेक्ट व्यवस्थापनाच्या जोरावर माळरान असलेल्या पंधरा गुंठ्यात 45 टन उसाचे उत्पादन घेतलेले आहे. नेमके शरद पाटील यांनी ही किमया कशी साध्य करून दाखवली? त्याबद्दलची माहिती या लेखात बघणार आहोत.

 पंधरा गुंठ्यात या शेतकऱ्याने घेतले 45 टन उसाचे उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की हातकणंगले तालुक्यातील लाटवडे या गावचे तरुण शेतकरी शरद विष्णू पाटील हे आयटीआय उत्तीर्ण असून त्यांचा टीव्ही रिपेरिंगचा व्यवसाय आहे.

या व्यवसायाला जोड म्हणून शेती व्यवसाय ते करतात. मात्र शेती नुसती करायची म्हणून न करता त्यांच्याकडे असलेल्या खडकाळ माळरानाच्या जमिनीमध्ये त्यांनी भरघोस उत्पादन काढण्याचे ठरवले व त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. याकरिता त्यांनी 15 गुंठे जमीन ऊस लागवडीसाठी तयार करण्याचे ठरवले व त्यासाठी तयारी सुरू केली.

 ऊस लागवडची तयारी कशी सुरु केली त्याचे व्यवस्थापन कसे केले?

याकरिता त्यांनी 15 गुंठे जमीन तयार केली व उभी नांगरट केल्यानंतर त्या जमिनीत चार ट्रॉली शेणखत टाकले व आडवी नागरट करून ८६०३२ या जातीच्या उसाची दोन डोळे पद्धतीने मागच्या वर्षी जून महिन्यात लागवड केली. खरीप हंगामामध्ये लागवड केल्यामुळे आंतरपीक म्हणून कोकण पद्धतीने भुईमूग लागवड देखील केली.

या ऊस पिकाला ड्रीप ची सोय करून पाट पाण्याची देखील सोय केली. या 15 गुंठामध्ये त्यांना सहा क्विंटल भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन झाले. ऊस पिकाचे व्यवस्थापन करताना ऊस पिकाच्या पानांची रुंदी वाढावी व उसाची पेरे जाड व्हावेत याकरिता दोन वेळा फवारणी व आळवणी देखील केली.

रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता व्यवस्थित व्यवस्थापन केले. दहा फुट अंतरामध्ये 55 ते 60 उसाच्या रोपांची संख्या ठेवली. अशा व्यवस्थापनाच्या माध्यमातून 45 कांडीचा लांबलचक ऊस तयार झाला. हा ऊस त्यांनी वारणा व शरद साखर कारखान्यांना पाठवला. या ठिकाणी या उत्पादित झालेल्या उसाचे वजन 45 टन 245 किलो इतके आले.

या 15 गुंठे क्षेत्रातील उसासाठी त्यांनी जो काही 40000 रुपयांचा खर्च केला तो खर्च वजा जाता त्यांना तब्बल एक लाख चार हजार रुपये व भुईमुगाच्या शेंगांचे मिळून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न यातून मिळाले.

अशा पद्धतीने शरद पाटील यांनी योग्य व्यवस्थापन करून अवघ्या पंधराच गुंठ्यात लाखो रुपयांचे उसाचे उत्पादन मिळवण्यात यश मिळवले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts