Ahmednagar News : पावसाळ्याचे अडीच महीने संपले. तरीही तालुक्यातील विहिरीचे पाणी वाढले नाहीत. पिके हिरवी दिसत असली तरी त्यांची वाढ खुंटली. आठवडाभरात पाऊस आला नाही तर पिके वाया जाणार हे नक्की.
भर पावसाळ्यात बारा गावांना नऊ टँकरच्या चोवीस खेपाने पिण्याचे पाणी पुरविले जाते आहे. आणखी चार गावांचे टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. बळीराजा आकाशाकडे डोळे लाऊन बसला आहे.
तालुक्यात यावर्षी पावसाची हजेरी कागदोपत्रीच जास्त दिसते. रेकॉर्डवर पाऊस पडला आहे प्रत्यक्षात जमिनीतुन पाणी बाहेर पडले नाही. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत कुठेही वाढ झालेली नाही. वीस गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. रोज टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीला दाखल होत आहेत.
मोहोज देवढे, करोडी, अकोला, पालवेवाडी, भुतेटाकळी, मोहरी, पत्र्याचा तांडा या गावांना नऊ टँकररोज २४ खेपा करून पिण्याचे पाणी पुरवित आहेत. लोहसर (पवळवाडी), मुंगुसवाडे, वैजुबाभुळगाव व करंजी येथील टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल आहेत. त्यापैकी तिन प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले आहेत.
तालुक्यात तुर, उडीद मुग, बाजरी भुईमुग व मोठ्या प्रमाणात कपाशी अशी पिके यावेळी घेण्यात आली आहेत. मात्र पिके पाण्याअभावी सुरु लागली आहेत. डोंगर व मुरमाड जमीनीतील पिके सुकली आहेत. ही पिके वाया जाणार या भितीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पिकांना झालेला खर्च वाया गेला तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाईल. कपाशीची वाढ खुंटली आहे. आकाशातील नेहमीच्या बदलामुळे पिकावर रोगाचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचा कैवारी होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना विम्याचे कवच आहे मग विमा कंपनीला आदेश दिले पाहीजेत की पंचनामे करावेत. पण आता हे नेमके कोण करणार असा प्रश्न आहे.
■ दुर्दैवाने पिकांच्या होणाऱ्या नुकसानी बाबत कोणताही पक्ष अथवा संघटना बोलायला तयार नाही. शेतकरी संघटीत नसल्याने व संघटीत होईल याची शक्यता कमी असल्याने याबाबत सरकारी पातळीवर आवाज उठविण्याची तसदी कोणीही घेत नाही.
महसुल विभागाने सुकणाऱ्या पिकांचे पंचनामे केले पाहीजेत. पाहणी करुन शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. सत्ताधारी व विरोधक कोणीतरी याबाबत बोलले पाहीजे. दोघेही बोलणार नसतील तर सामाजिक काम करणाऱ्या संघटनांनी पुढे आले पाहीजे अशी मागणी सामान्य शेतकरी करीत आहे.