कृषी

Farmer Success Story: तैवान पिंक पेरूच्या लागवडीने ‘या’ शेतकऱ्याला पोहचवले आर्थिक उंचीवर! मिळवले 15 लाखांचे उत्पन्न

Farmer Success Story:- आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीमधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता आर्थिक नफा मिळवत आहेत व कमीत कमी क्षेत्रात देखील जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यामध्ये शेतकरी आता यशस्वी झाल्याचे चित्र आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत शेतकरी आता नवनवीन अशी पिके जसे की भाजीपाला पिके, विविध प्रकारची फळबाग लागवड तसेच शेडनेट मधील फुलशेती सारख्या शेती प्रयोग करून लाखोत आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.

अगदी याचे अनुषंगाने जर आपण आष्टी तालुक्यातील दादेगाव या गावचे मुरलीधर पठारे यांची शेती पाहिली तर ती इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल.

मुरलीधर पठारे यांनी अडीच लाख रुपये खर्च केले व  प्रचंड कष्टाच्या जोरावर अडीच लाख रुपये गुंतवणूक करून पंधरा लाखांचे उत्पन्न घेत तैवान पिंक पेरूची लागवड यशस्वी केली. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 तैवान पिंक लागवडीतून मुरलीधर पठारे यांनी कमावले पंधरा लाख

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील शेतकरी मुरलीधर पठारे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तैवान पिंक पेरू लागवड करण्याचा निर्णय घेतला व याकरिता 2021 मध्ये पाटेगाव या ठिकाणी 8850 तैवान पिंक रोपे विकत आणली व सत्तर गुंठ्यात त्याची लागवड करण्याचे ठरवले.

लागवडीसाठी त्यांनी दहा बाय पाच पद्धतीचे अंतर ठरवले व त्यानुसार लागवड करून ठिबक सिंचनाची व्यवस्था केली व त्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. खत व्यवस्थापनापासून तर कीड व रोग व्यवस्थापन याकरिता त्यांनी चोख नियोजन ठेवले व पेरू लागवडीपासून साधारणपणे 22 महिन्यांनी याला फळधारणा व्हायला सुरुवात झाली.

लागवड ते उत्पन्न मिळवण्याचा कालावधी यामध्ये तीन वर्षे गेले व या तीन वर्षांमध्ये त्यांचा रोपे तसेच फवारणी, मजुरी व ठिबक सिंचनासारख्या गोष्टींवर दोन लाख 50 हजार रुपये खर्च झाला.

या सगळ्या नियोजनामध्ये त्यांच्या पत्नी सुनंदा पठारे यांची त्यांना मोलाची साथ लागली व दोघांनी प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन या बागेचे व्यवस्थापन केले व तैवान पिंक पेरूचे भरघोस उत्पादन मिळवून त्यापासून तब्बल 15 लाख रुपयांचे उत्पन्न हाती मिळवले.

 या भागात व्यापारीच करतात फळांची तोडणी खरेदी

दादेगाव व आजूबाजूचा परिसर पाहिला तर हा तसा पाहिला गेला तर दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु यावर मात करत इथल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिकांचे उत्पादन यशस्वीरित्या घेतले आहे.

भागातील पेरू थेट गुजरातच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो व त्या ठिकाणी त्याला मागणी देखील चांगली असते. अगोदर शेतकरी ज्या फळ पिकांची लागवड करत होते व उत्पादन घेत होते त्या फळांची तोडणी शेतकऱ्यांना स्वतः करावी लागायची व मुंबई तसेच पुणे सारखे बाजारपेठेमध्ये स्वखर्चाने घेऊन जावे लागायचे.

परंतु कालांतराने यामध्ये बदल झाला असून आता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतात येऊन तोडणी केली जाते व मालाची खरेदी देखील केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचण्यास मदत झाली.परंतु दर देखील चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts