Floriculture Farming:- आजकालचे उच्चशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये नशीब आजमावत असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीची शेती पद्धत आणि पिकांच्या लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या फळपिके तसेच फुलपिके आणि भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येतात व इतकेच नाहीतर शेती संबंधित असलेल्या जोडधंदयामध्ये देखील अनन्य साधारण प्रगती अनेक तरुणांनी केली असल्याचे आपल्याला दिसून येते.
सोप्या शब्दात सांगायचे म्हटले म्हणजे खऱ्या अर्थाने शेतीला व्यवसायिक दृष्टिकोन प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने तरुणाईची शेतीतील कामगिरी खूपच कौतुकास्पद अशी आहे. अगदी याच मुद्याला धरून जर आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील अमोल राखुंडे या तरुणाचे उदाहरण घेतले तर हा उच्चशिक्षित तरुण असून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेली आहे.
परंतु त्याने या सगळ्या शिक्षणाचा वापर शेतीमध्ये करण्याचे ठरवून फुलशेती करण्याला प्राधान्य दिले व त्यामध्ये यश देखील मिळवले आहे.
शेवंती लागवडीतून मिळवतो लाखोत उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील उच्चशिक्षित तरुण अमोल राखुंडे याने सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेली आहे.
परंतु नोकरीच्या मागे न लागता त्याने त्याच्या डिकसळ शिवारात असलेल्या शेतीत नशिब आजमावण्याचे ठरवले व फुल शेती करण्याचे निश्चित करून गेल्या तीन वर्षापासून तो शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहे. विविध प्रकारच्या पिकांची यशस्वी उत्पादने त्याने मागील तीन वर्षात घेतले आहेत.
विशेष म्हणजे फूल शेतीसारख्या आव्हानात्मक पिकाची देखील त्याने यशस्वीपणे उत्पादन मिळवले असून या शेतीत त्यांनी स्वतःचा हातखंडा निर्माण केला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी त्याने बिजली फुलांची लागवड यशस्वी केली होती व यावर्षी त्याने शेवंती फुलशेती देखील यशस्वी करून दाखवलेली आहे. तीन एकर क्षेत्रावर त्याने शेवंती लागवड केली असून सध्या या शेवंतीची तोडणी सुरू असून आतापर्यंत 12 टन शेवंतीची विक्री करण्यात आलेली आहे.
यात सगळ्या प्रकारची परिस्थिती जर अनुकूल राहिली तर अजून एक महिनाभर शेवंती उत्पादन मिळेल व लाखो रुपयांचे उत्पन्न अमोलला या माध्यमातून मिळणार आहे.
कसे केले शेवंती पिकाचे नियोजन?
अमोलने जेव्हा फुलशेती लागवड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तीन एकर क्षेत्रावर शेवंती लागवड करण्याचे ठरवले. त्याआधी तीन एकर क्षेत्रामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला नांगरट करून त्यामध्ये पंधरा ट्रॉली शेणखत टाकले व पाच फुटांची सरी काढून ठिबक संच जोडणीचे नियोजन करून त्यावर 15 मे रोजी लागवड केली. याकरिता पुणे येथून दोन रुपये 90 पैसे जागेवर या दराने पांढरी शेवंतीची रोपे खरेदी केली व पाच बाय सव्वा फूट या अंतरावर लागवड केली.
जवळपास तीन एकर मध्ये एकूण 28 हजार रुपयांची लागवड त्याने केली आहे.लागवड केल्यानंतर आवश्यकतेनुसार रिंग पद्धतीने शेवंतीच्या रोपाला बेसल डोस दिला व पाच दिवसानंतर मिश्र व विद्राव्य खतांची 60 दिवसापर्यंत व पुढे याच पद्धतीने 13:40:13 तसेच 0:52:34 इत्यादी खतांच्या मात्रा दिल्या.
शेवंती पिकामध्ये कळी खुलणे तसेच फुलफुट टाळणे व येऊ शकणाऱ्या कीड व रोगांची व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाने व्यवस्थित काळजी घेतली. अशाप्रकारे केले पाणी व्यवस्थापन शेवंती पिकासाठी जमिनीची निवड करताना ती पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
अमोल याने पहिली दीड महिने दररोज दहा मिनिटे व त्यानंतर दररोज अर्धा तास या प्रकारे पाणी व्यवस्थापन या पिकासाठी केले. तसेच शेवंतीवर मावा तसेच अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो व त्या दृष्टिकोनातून आणि करपा रोगाच्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी आवश्यक त्या फवारण्या करण्याची काळजी घेतली.
या सगळ्या परफेक्ट व्यवस्थापनामुळेच सध्या शेवंतीचे भरपूर उत्पादन त्यांना मिळत आहे. पहिल्याच तोड्याने मिळवून दिले पाच लाखांचे उत्पन्न अमोल राखुंडे यांनी लावलेले शेवंतीचे उत्पादन 130 दिवसांनी त्यांना मिळायला सुरुवात झाली होती व पहिलाच तोड्यात चार टन उत्पादन मिळाले व त्यांनी ते हैदराबादला विक्रीसाठी पाठवले.
त्या ठिकाणी दीडशे रुपये दराने विक्री होऊन पाच लाखांवर रक्कम त्यांना मिळाली. त्यानंतरच्या पुढील तीन तोड्यामध्ये आठ टन उत्पादन मिळाले. शेवंतीसाठी केलेला खर्च जर बघितला तर एकरी दीड ते दोन लाखापर्यंत त्यांना खर्च आलेला आहे. त्यांचा हा शेवंतीचा प्लॉट मात्र नफ्यात राहिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.