कृषी

4 वर्षात 1 कोटीचा निव्वळ नफा! मोसंबीने शेतकऱ्याला बनवले कोट्याधीश, वाचा कसे..

महाराष्ट्रामध्ये सध्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून डाळिंब, द्राक्षे, पेरू, सिताफळ आणि विदर्भ म्हटले म्हणजे मोसंबी इत्यादी फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात होते. फळबागांचे उत्तम व्यवस्थापन आणि योग्य नियोजन जर वेळेवर ठेवले तर खूप चांगल्या पद्धतीचे उत्पादन हातात येते. परंतु गेल्या काही वर्षांचा विचार केला तर हवामान बदल तसेच अतिवृष्टी, गारपिटीमुळे देखील फळबागांचे अतोनात नुकसान होताना आपल्याला दिसून येते.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो आहे. परंतु हवामानाच्या विपरीत परिस्थितीत सुद्धा बदनापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोसंबी पिकाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवला आहे. जर आपण या शेतकऱ्याचा विचार केला तर मोसंबी बागेच्या माध्यमातून चारच वर्षात एक कोटी रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी मिळवलेला आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 या शेतकऱ्याने चार वर्षात मिळवला एक कोटीचा निव्वळ नफा

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील प्रगतिशील शेतकरी गोविंद नानासाहेब नन्नवरे यांनी योग्य नियोजन तसेच वेळेवर मेहनत आणि आवश्यक तांत्रिक सल्ला घेत व्यवस्थित शेतीचे नियोजन केले व त्या माध्यमातून आपल्या मोसंबी उत्पादनातून या वर्षी जवळपास 20 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. गोविंद नन्नवरे यांची देवपिंपळगाव या गावी शेती असून जवळजवळ 25 एकर मध्ये त्यांनी साडेतीन हजार मोसंबी झाडांची लागवड केलेली आहे.

या संपूर्ण बागेचे त्यांनी खूप योग्य पद्धतीने नियोजन केले आणि आवश्यक बाबी वेळेवर पूर्ण केल्या.जर आपण गोविंद नन्नवरे यांचा विचार केला तर ते गेल्या चार वर्षापासून मोसंबी फळबागापासून उत्तम आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. गेल्या चार वर्षाच्या कालावधीत त्यांनी या फळ पिकातून एक कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. नन्नवरे हे मृग बहाराचे नियोजन मे महिन्यापासून करतात आणि त्यामध्ये आवश्यक खतांचा डोस तसेच फवारण्या करतात.

जर आंबिया बहाराचा विचार केला तर ते नोव्हेंबर पासून त्याचे नियोजन करत असल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. या नियोजनामध्ये ते कृत्रिम रित्या झाडे ताणावर आणणे तसेच कंपोस्ट खतांचा वापर, रासायनिक खते तसेच कंपोस्ट खतांचा योग्य समन्वय साधत ते हे उत्पन्न मिळवत आहेत. विशेष म्हणजे या यशामध्ये त्यांना बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्र व खरपुडी येथील तज्ञांचे योग्य आणि अनमोल मार्गदर्शन मिळत आहे.

नैसर्गिक संकटांवर मात करत त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले असून बागेवर योग्य फवारणी केल्यामुळे त्यांना या वर्षी देखील चांगले उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यासारख्या अचानक येणारे आसमानी नैसर्गिक संकटे यामुळे नेहमी शेतकरी अडचणीत सापडतात. परंतु नन्नवरे यांनी त्यावर यशस्वीपणे मात करत कोटीच्या घरात आर्थिक उत्पन्न मिळवले असून  हे नक्की इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts