Categories: कृषी

‘ही’ पाच अवजार आहेत जमीन नांगरणी साठी उपयुक्त, वाचा शेतकऱ्यांसाठी कोणते अवजार ठरेल जास्त फायद्याचे?

कोणत्याही पिकाच्या लागवडीअगोदर जेव्हा आपण जमिनीची पूर्व मशागत करतो त्यामध्ये सगळ्यात आधी जमिनीची नांगरणी करणे गरजेचे असते. कारण पूर्व मशागतीमध्ये जमीन नांगरणीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून पुढील पिकाच्या भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील नांगरणी महत्वाची असते. चांगली खोल नांगरणी केल्यामुळे अनेक पिकांवरील नुकसानकारक किडींचे कोष वरती येतात व उन्हामुळे जमीन तापल्याने ते नष्ट होतात.

त्यामुळे पुढील पिकावर नक्कीच कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी पाहायला मिळतो. त्यामुळे नांगरणी ही खूप उपयुक्त बाब आहे. तर आपण पारंपारिक शेती पद्धतीचा विचार केला तर यामध्ये बैलांच्या सहाय्याने लोखंडी नांगर किंवा लाकडी नांगराचा वापर हा प्रामुख्याने शेतकरी करत असत. परंतु आता शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे युग आल्यामुळे अनेक प्रकारची कामे आता यंत्रांच्या साह्याने होऊ लागली असून शेतीच्या पूर्व मशागतीचे कामे देखील आता यंत्रांच्या साह्याने केले जातात.

यामध्ये जर आपण जमीन नांगरण्यासाठी  आवश्यक असलेल्या अवजारांचा विचार केला तर बहुतांशी अवजारे हे ट्रॅक्टर चलित आहे. तसेच जमिनीची नांगरणी आणि पूर्व मशागतिकरीता देखील ट्रॅक्टर चलीत उपयुक्त असे अवजारे असून यांच्या साह्याने जमिनीची नांगरणी आणि नांगरणी केल्यानंतर माती भुसभुशीत करण्याकरिता यांचा वापर होतो. याबद्दलचीच महत्वाची माहिती आपण घेणार आहोत.

 जमीन नांगरण्याकरिता वापरली जाणारी महत्त्वाची उपकरणे

1- नांगराचे प्रकार

)-मोल्डबोर्ड नांगर जमिनीच्या मशागतीसाठी वापरले जाणारे अवजारांपैकी हे एक महत्त्वाचे अवजार असून या मोल्ड बोर्ड नांगरामध्ये एक मोल्डबोर्ड नावाची मोल्डेड धातूची प्लेट असते. या प्लेटच्या साह्याने माती काढण्याचे म्हणजेच मातीचा थर उलटापालट करण्यासाठी हे प्रभावीपणे काम करते. त्यामुळे जमिनीवर पडलेले पिकांचे आणि तणांचे अवशेष देखील जमिनीमध्ये काढले जातात. कठीण प्रकारची जमीन नांगरण्याकरिता मोल्ड बोर्ड नांगर उपयुक्त ठरतो. या नांगराच्या साह्याने जमीन नांगरल्यामुळे जमीन चांगली मोकळी होते व यामध्ये पाणी आणि हवा योग्य प्रकारे खेळती राहते व पीक उत्पादनासाठी याचा फायदा होतो.

)-डिस्क नांगर डिस्क नांगर हे देखील एक महत्त्वाचे अवजार असून कठीण आणि खडकाळ जमीन नांगरण्याकरिता हे प्रामुख्याने वापरले जाते. डिस्क नांगरची रचना अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की या माध्यमातून तो जमिनीत खोलवर जाऊ शकतो. यामध्ये तीन पेक्षा अधिक धातूच्या डिस्क असून त्या मागच्या बाजूस झुकलेल्या असल्यामुळे ते जमिनीत खोलवर जातात. याला असणाऱ्या चकत्या माती कापतात व लहान लहान तुकडे देखील करतात. मोल्ड बोर्ड नागरा पेक्षा डिस्क नांगर चिकन माती आणि खडकाळ असलेल्या जमिनीमध्ये देखील उत्तम प्रकारे काम करू शकतो.

)-उलटा करता येणारा नांगर या नांगराच्या साहाय्याने ट्रॅक्टर पुन्हा न फिरवता देखील सतत नांगरणी करता येणे शक्य आहे. उलट करता येणाऱ्या नांगराच्या विशिष्ट अशा रचनेमुळे आणि त्याच्या कार्यक्षमतेमुळे अलीकडच्या वर्षात शेतकऱ्यांमध्ये त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. या प्रकारचा नांगर हा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीकरिता योग्य आहे.

2- कल्टीवेटर कल्टीवेटर हे बहुउद्देशीय असे कृषी अवजार असून यामध्ये एक फ्रेम असते व याला टायन्सची एक मालिका जोडलेली असते व ती ट्रॅक्टरच्या पॉवरच्या माध्यमातून खेचली जाते. या माध्यमातून कल्टीवेटर वर जे काही टायन्स असतात ते जमिनीमध्ये घुसतात व चांगल्या प्रकारे जमीन मोकळी करतात. तसेच जमिनीचे जे काही कठीण थर असतात ते देखील सैल होतात. तसेच तणाचे अवशेष बाहेर काढण्याकरिता देखील कल्टीवेटर चा वापर होतो. कल्टीवेटर ने जमीन तयार केल्यानंतर जमिनीमध्ये हवा चांगली खेळती राहते तसेच तणांच्या वाढीवर देखील नियंत्रण मिळवता येते.

3- रोटावेटर रोटावेटर चा वापर हा पिकांची लागवड करण्यापूर्वी माती भुसभुशीत करण्याकरिता केला जातो. नांगरणी केल्यानंतर जे काही ढेकूळ निघालेले असते ते ढेकूळ फोडण्याकरिता रोटावेटर प्रामुख्याने वापरले जाते. रोटावेटर मध्ये अनेक फिरणारे ब्लेड असतात व त्या साह्याने ढेकूळ फोडले जाते. तसेच नांगरणी विरहित जमीन तयार करण्याकरिता देखील रोटावेटर चा वापर होतो.

4- सबसॉयलर ट्रॅक्टरच्या साह्याने चालवले जाणारे जमीन मशागतीचे उपकरण असून त्याच्या साह्याने जमिनीची खोल मशागत केली जाते. जर तुम्हाला मोल्डबोर्ड नांगर किंवा डिस्क हॅरो या उपकरणांपेक्षा खोल नांगरणी करायचे असेल तर त्याकरता तुम्हाला सब सॉयलर अतिशय योग्य ठरते.

5- हॅरो जमीन तयार करण्याकरिता म्हणजेच पूर्व मशागती करीता हे एक महत्त्वाचे कृषी उपकरण असून या उपकरणाचे डिस्क हॅरो आणि पावर हॅरो असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारच्या अवजारांची कार्य समान आहेत. फक्त त्यांची डिझाईन आणि काही महत्त्वाच्या बाबींमध्ये काही फरक करण्यात आलेला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts