कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये आधुनिक पिकांची लागवड करून लाखोत नफा मिळवू लागले आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देत आता शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाला पिके तसेच फळबागा लागवड आणि विविध प्रकारच्या फुल पिकांच्या लागवडीतून खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवत आहेत.
यामध्ये जर फुल पिकांचा विचार केला तर शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमी जागेत, कमी खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. याशिवाय मोकळ्या क्षेत्रावर देखील तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापन अचूक ठेवून शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन घेताना आपल्याला दिसून येत आहेत.
याच मुद्द्याला धरून जर आपण भोर तालुक्यातील राजापूर गावचे रमेश बोबडे या शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने गुलछडी फुलाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. या लेखामध्ये आपण रमेश शिवराम बोबडे या शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.
गुलछडी उत्पादनातून मिळवली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोर तालुक्यातील राजापूर या गावचे प्रयोगशील शेतकरी रमेश शिवराम बोबडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि हवामान, उपलब्ध पाणी आणि वातावरणाची व्यवस्थित सांगड घालत गुलछडीचे पीक घेतलेले आहे.
या पिकाची लागवड करण्यासाठी त्यांनी अगोदर ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरणी करून घेतली व जमीन साधारण एक महिनाभर व्यवस्थित तापू दिली. त्यानंतर या जमिनीमध्ये तीन ट्रॉली शेणखत टाकले व त्यानंतर रोटर मारून जमीन चांगली भुसभुशीत करून घेतली.
वीस गुंठ्यामध्ये घरच्या शेतातच तयार केलेली गुलछडीचे साडेतीन पोती कंदांचा वापर करून चार फूट सरीमध्ये आठ इंचावर कंदाची लागवड मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली. गुलछडीचे कंद दर्जेदार वाढावे याकरिता खतांचा पहिला डोस लागवडीच्या एक महिन्यानंतर दिला व यामध्ये युरिया,फॉस्पेट,10:26:26, एमओपी यांचे मिश्रण करून पिकासाठी वापर केला.
तसेच खताचा दुसरा डोस दोन ते अडीच महिन्यात दिला व तिसरा डोस साडेतीन महिन्यात दिला व यावेळी कंदाच्या कडेला एक खड्डा घेतला व त्यामध्ये खते टाकली. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव वातावरणातील बदल पाहून कीटकनाशकांची फवारणी केली.
तसेच हिवाळ्यामध्ये त्यांनी या पिकाची विशेष काळजी घेतली. यामध्ये पाटपाणी तसेच स्प्रिंकलरचा वापर करून आठ दिवसांनी पाणी व्यवस्थापन केले. गरजेनुसार पाण्याचे व्यवस्थापन केल्याने फायदा मिळाला. लागवडीनंतर जुलै महिन्यात फुलांची तोडणी सुरू झाली. फुलांची तोडणी करताना ते सकाळी सहा ते साडेसात या दरम्यान करतात व पुणे येथील गुलटेकडी फुल बाजारामध्ये फुलांची विक्री केली जाते.
काय दराने होत आहे विक्री?
या फुलांची विक्री प्रतिकिलो 50 रुपयांपासून ते 150 रुपये व एक काडी बंडल पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रमाणे विक्री होत आहे. आज अखेर दीड लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना या माध्यमातून मिळाले असून अजून एक लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.
या फुलांचा काढणी साधारणपणे जुलै महिन्यात सुरू होते व मे महिन्यापर्यंत चालते.यावर्षी गुलछडीला चांगला दर मिळत असल्याने कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून त्याचा फायदा झालाच परंतु पुण्यासारखे मार्केट जवळ असल्याने वाहतूक खर्च कमी होऊन रोज चांगल्या दराने विक्री करणे शक्य झाले.